राफेल लढाऊ विमान व्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून ३० हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढून ते एका ‘अकुशल’ व्यक्तीला देणे हाच पंतप्रधानांचा ‘स्कील इंडिया’चा कार्यक्रम असल्याचा टोला त्यांनी लगावला.

भारतातील बेरोजगारीबाबतचे एक वृत्त शेअर करत राहुल गांधींनी ट्विट केले आहे. पंतप्रधानांचा स्कील इंडिया कार्यक्रम. एचएएलकडून ३०,००० कोटी रूपये चोरायचे आणि ते अशा एका व्यक्तीला द्यायचे ज्याच्याकडे कोणतेच कौशल्य नाही. याचदरम्यान, देशातील कोट्यवधी कुशल युवक २० वर्षांतील सर्वांत उच्च स्तराच्या बेरोजगारीचा सामना करत आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या अमेरिकन वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, भारतातील बेरोजगारीचा दर मागील २० वर्षांतील सर्वांत उच्च स्तरावर आहे.

मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी डेसॉल्टकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. त्याचे मूल्य तत्कालीन यूपीए सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याचा दावा राहुल गांधी आणि काँग्रेसकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. या व्यवहारामुळे सरकारी खजिन्यातील हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार, असल्याची काँग्रेसकडून सांगितले जाते. पंतप्रधान मोदींनी या व्यवहारात बदल करत एचएएलकडील कंत्राट काढून घेऊन ते रिलायन्स डिफेन्सला दिल्याचा आरोपही केला जात आहे.