गो करोना, करोना गो! या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चर्चेत आले होते. आता त्यांनी एक नवी घोषणा दिली आहे. ही घोषणा आहे ‘नो करोना, नो करोना! करोनाच्या संकटाबाबत रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ही नवी घोषणा दिली आहे. गो करोना, नो करोना असंही आठवले यावेळी म्हणाले. तसेच मी सगळा वेळ घरातच घालवत आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असंही आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं.

“गो करोना, करोना गो ही माझी भावना होती जी बोलून दाखवली होती. २० फेब्रुवारीला मी चीनच्या अँबेसेडेर होते त्यांच्यासोबत एक प्रतीकात्मक कार्यक्रम घेतला होता. सध्या मी स्वतः घरातच राहतो आहे. करोना आपल्यापर्यंत पोहचू द्यायचा नसेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. मी घरात बसून कविता लिहितो, पुस्तकं वाचतो, कॅरम खेळतो, गिटार वाजवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातल्या विविध लोकांशी रोज संवाद साधतो. त्याचप्रमाणे मी घरात बसून काय काय करायचं याची एक नियमावलीच तयार केली आहे. त्याप्रमाणे ती प्रत्येकाने आखावी आणि आपला जीव वाचवावा” असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.

गो करोना हे कसं सुचलं याचंही उत्तर रामदास आठवले यांनी दिलं. “चायनामध्ये करोना त्यावेळी आला होता. त्यामुळे मला ही घोषणा अचानक आठवली. मला अशा बराच गोष्टी आठवत असतात. माझं नावच आठवले असल्याने मला गोष्टी योग्य वेळेवर आठवतात. त्यामुळे करोनाला हद्दपार करण्यासाठी ही घोषणा देऊ. माझी ही घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली. आता मी म्हणतोय नो करोना, नो करोना. करोना गो ही माझी भावना होती. करोना हा महामारी आहे. त्याला आपण जा म्हटल्यावर तो जाणार नाही हे मला माहित आहे. मात्र प्रतीकात्मक म्हणून ती घोषणा दिली. “