प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांचं नाव नेहमीच चांगल्या कामामुळे चर्चेत असतं. कोविड काळात टाटांनी केलेल्या मदतीचं कौतूक झालं होतं. संकटकाळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या रतन टाटांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहे. कंपनीतील निवृत्त कर्मचारी आजारी असल्याचं कळाल्यानंतर टाटांनी थेट पुणे गाठलं आणि भेटून प्रकृतीची विचारपूस केली.

लिंक्डइनवर एका व्यक्तीने केलेल्या पोस्टमुळे टाटांचं संवेदनशील व्यक्तिमत्व समोर आलं आहे. टाटा कंपनीत कार्यरत असलेला एक सेवानिवृत्त कर्मचारी मागील दोन वर्षांपासून आजारी आहे. या कर्मचाऱ्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्याला गेले आणि माजी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी टाटांना कर्मचाऱ्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन माजी कर्मचाऱ्याला दिलं.

कोणताही गाजावाजा न करता. कोणतीही सुरक्षा न घेता. सर्वसामान्य माणसाप्रमाणे रतन टाटांनी माजी कर्मचाऱ्याचं घर गाठलं आणि सुखद धक्का दिला. त्यामुळे माजी कर्मचारीही भारावून गेला. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी टाटांचं कौतुक केलं. टाटांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला असल्याची भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबांना दुःख सहन करावं लागलं होतं. त्यावेळीही रतन टाटांनी ८० कुटुंबांना धीर दिला होता. टाटांनी घरी जाऊन त्या कुटुंबांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांचा खर्च उचलण्याचंही आश्वासन दिलं होतं.