‘चोगम’सारख्या बहुपक्षीय व्यासपीठावर उपस्थित राहून मानवी हक्कांसारखे मुद्दे उपस्थित करता येतात. त्यामुळे अशा परिषदांवर बहिष्कार घालण्यापेक्षा तेथे उपस्थित राहणेच योग्य वाटते, असे मत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. मात्र ‘चोगम’ परिषदेस उपस्थित न राहण्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो, असेही कॅमेरून यांनी नमूद केले. भारतीय उद्योजकांशी संवाद साधताना कॅमेरून यांनी ‘चोगम’सारख्या परिषदांबद्दल अनुकूलता व्यक्त केली. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण आदर आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे, असे कॅमेरून म्हणाले. ‘चोगम’ परिषदेसाठी आपण श्रीलंकेला जाणार असून अध्यक्ष राजपक्षे यांच्यासमवेत स्वतंत्र बैठकही घेण्याची विनंती केली आहे, असे ते म्हणाले.