पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटलेल्या जनता परिवारात बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापूर्वीच फूट पडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली येत्या ३० ऑगस्ट रोजी पाटण्यात होणाऱ्या सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही सहभागी होणार नसल्याने परिवारात खडाखडी सुरू झाली आहे. जनता परिवारातील सर्व नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या सभेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला आहे, तर काँग्रेसने पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव पुढे केले आहे. सोनिया गांधी सभेत गेल्यास जनता परिवाराकडून राहुल यांना प्रचारादरम्यान फारसे महत्त्व दिले जाणार नसल्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख नेत्यांना या सभेपासून लांब ठेवण्यात येईल. या सभेत समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव सहभागी होतील. जनता परिवाराची ही पहिलीच सभा आहे.
नितीशकुमार यांच्या वर्चस्वामुळे  वाटय़ाला आलेल्या जागांवरच निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली. त्यामुळे एक प्रकारे नितीश यांनी काँग्रेसला बिहारमध्ये प्रचारात मर्यादा आणली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचा केवळ चार सभा होतील, असे सांगून काँग्रेसने नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिवारातील या कुरबुरीमुळे ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसभेत काँग्रेसकडून सोनिया वा राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही उपस्थित राहणार नाही. सोनिया गांधी केवळ काँग्रेस उमेदवारांचाच प्रचार करतील. तर परिवारधर्म म्हणून राहुल जदयू, राजद उमेदवारांचा प्रचार करतील. प्रत्यक्षात जदयू व राजदच्या अनेक बडय़ा नेत्यांना राहुल यांची सभा न घेण्याचा सल्ला नितीशकुमार यांना दिला आहे. राहुल यांची सभा घेतल्यास फायद्याऐवजी नुकसान होईल, अशी भीती जद (यू ) नेत्यांना वाटते.
एकमेव सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहारमध्ये आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत. तिसरी सभा येत्या २९ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या सभांमधून बिहारसाठी मोठमोठय़ा योजनांची घोषणा केल्याने ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सभेनंतर लगेचच निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. मोदींच्या तीन सभांच्या प्रत्युत्तरात जनता परिवाराने आयोजित केलेल्या एकमेव सभेवर परिवारातील कुरबुरींचे सावट आहे.