कर्नाटकमधील दूरध्वनी टॅपिंग प्रकरणाच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तशी मागणी केली असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले.

दूरध्वनी टॅपिंगच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्यासह अनेक नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य उजेडात आणण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आपण सोमवारी सीबीआय चौकशीचे आदेश देणार असल्याचे येडियुरप्पा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी राज्यातील जनतेचीही अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी सरकारने दूरध्वनी टॅप केले आणि आपल्यासह ३०० नेत्यांवर हेरांमार्फत लक्ष ठेवले होते, असा आरोप जेडीएसचे अपात्र आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केल्याने कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात भूकंप झाला होता.

सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे आणि तत्कालीन गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती, तर डी. के. शिवकुमार यांनी टॅपिंगचा आरोप फेटाळून कुमारस्वामी यांची पाठराखण केली होती.

कोणत्याही चौकशीसाठी तयार -कुमारस्वामी

बंगळूरु: कर्नाटकमधील दूरध्वनी टॅपिंग प्रकरणाची सीबीआयमार्फतच नव्हे तर एखाद्या आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात आली तरी त्याला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काँग्रेसने मात्र सीबीआय चौकशीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारने सीबीआय चौकशी करावी किंवा अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अथवा सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा करावी अथवा सरकारच्या विश्वासातील व्यक्तीमार्फत चौकशी करावी, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.