जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणजे लडाख. यामुळेच लडाखला जगाचे छप्पर (roof of the world ) म्हणूनही ओळखले जाते. मागील काही वर्षांपासून लडाखला जाणाऱ्या पर्यटकांची संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा मोठा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला आहे. याच प्रश्नावर अमेरिकेतील उद्योजक आणि संशोधक इलॉन मस्क यांच्या टेस्ला का कंपनीने एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. ‘बॅकहोल’ मशिन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे टेस्ला आता पर्यावरणाची हानी न होऊन देता लडाखचा परिसर स्वच्छ करणार आहे.
लडाखमधील पर्यटकांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. २०११मध्ये लडाखला १ लाख ८० हजार पर्यटकांनी भेट दिली. या वर्षी हाच आकडा २ लाख ८० हजार इतका असून ऑक्टोबरपर्यंत लडाखमधील पर्यटनाचा काळ संपेपर्यंत हा आकडा ३ लाखांहून अधिक असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यांमध्ये लडाखला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. वायव्य लडाखमधील नूबरा व्हॅली, पँगगॉग-टीसो आणि टीसो-मोरीर तलाव या सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन ठिकाणांवर दिवसाला १५ ते १६ टन कचरा निर्माण होतो. स्थानिकांपेक्षा पर्यटकच लडाखमध्ये जास्त कचरा करतात यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे.
स्थानिकांचे जनजीवन सामान्य पद्धतीचे असल्याने स्थानिक लोकांचा कचरा निर्मितीमधील वाटा अगदीच नगण्य आहे. मात्र लडाखमध्ये येणारे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विघटीत न होणारे, पुनर्वापर न करता येणाऱ्या वस्तूंचा कचरा करतात. आत्ताच येथे कचऱ्याचा २० वर्षांचा अनुशेष तयार झाला आहे अशी माहिती लडाखच्या उपायुक्त लवासा यांनी दिला.
नाइलाजास्तव विस्तीर्ण मैदानांवर हा कचरा पडून राहतो. आर्थिक आणि भौगोलिक दृष्ट्या लडाखसारख्या ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने आणि ते वर्षातील काही काळ वाहतूकीसाठी बंद असल्याने रस्त्यांच्या आजूबाजूला पर्यायी व्यवस्था उभारता येत नाही. याच कारणामुळे टेस्लाचे ब्लॅकहोल तंत्रज्ञान अशा विस्तीर्ण मैदानांवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पर्याय आहे. या तंत्रज्ञानामध्ये वीज तसेच कोणत्याही इंधनाचा वापर न करता काचेच्या वस्तू वगळता इतर सर्व प्रकारच्या कचऱ्याचे विघटन करता येते.
आम्ही बंगळूरमधील टेस्ला एनर्जी (अमेरिकेतील टेस्ला ग्रीन कंपनीची भारतातील शाखा) या कंपनीकडे या मशिनची ऑर्डर दिली आहे. दिवसाला एक टन कचऱ्याचे विघटन करण्याची क्षमता असणारी ही यंत्रणा लडाखमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये कार्यरत होईल अशी अपेक्षा असल्याचे लवासा यांनी सांगितले. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लडाखमधील कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय शोधण्याचे ठरवले आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (बीआरओ) रस्तेबांधणीसाठी कचऱ्यामधील प्लॅस्टिकचा वापर करणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती लवासा यांनी दिली.
सध्या लडाखमध्ये केवळ बॉम्बे घाट येथेच कचरा योग्य पद्धतीने एकत्रित करण्यात येतो. आधी हा परिसर भारतीय सौंरक्षण दलांकडून शस्त्रसाठा ठेवण्यासाठी वापरला जात असे. हा परिसर वगळता संपूर्ण लडाखमध्ये ठिकाठिकाणी अयोग्य पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये कचरा टाकला जातो तर पर्यटकांकडून डोंगर परिसरात किंवा पठारांवर वाटेल तिकडे कचरा फेकला जातो. त्यामुळे लडाखमध्ये कचरा पसरत चालला आहे. हिच परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाण्याआधी लवासा यांनी लेह येथील चोंगलामसार आणि नुबरा आणि निम्मू येथील डिस्कीत येथे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. लेह पासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या ठिकाणाहून कचार नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या ब्लॅकहोल प्लॅण्टमध्ये विघटनासाठी आणला जाईल. लवासा यांनी पॅनगाँग तलावाच्या आजूबाजूच्या १५० मीटरच्या परिसरामध्ये बांधकाम करण्यावर बंदी घातली आहे. तसेच पर्यटकांच्या संख्येवर थोड्याफार प्रमाणात अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने या परिसरामध्ये नवीन टॅक्सींना परवाना देण्यावरही लवासा यांनी बंदी घातली आहे.