पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांसाठीचा प्रचार आणि भाजपा वि. ममता बॅनर्जी हा कलगीतुरा चांगलाच रगू लागला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना अनेकदा पातळी सोडून आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने सोमवार १२ एप्रिल २०२१ संध्याकाळी ८ ते मंगळवार १३ एप्रिल २०२१ संध्याकाळी ८ वाजेपर्यंत अशी २४ तासांची प्रचारबंदी घातली. प्रचारादरम्यान जनतेच्या भावना भडकावणारी विधानं केल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर ही प्रचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी या प्रचारबंदीच्या काळात धरणे आंदोलन सुरू केलं. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान कोणतंही विधान किंवा आरोप न करता ममतादीदींनी शांतपणे चित्र काढणं पसंत केलं.

निवडणूक आयोगाने आपल्यावर घातलेली प्रचारबंदी पूर्णपणे घटनाविरोधी असल्याची भूमिका घेत त्याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मायो रोड परिसरातील गांधी मुर्ती येथे धरणे आंदोलनाला बसल्या. सकाळी ११.३० वाजल्यापासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी यांनी कोणतीही राजकीय कृती न करता हातात कॅनव्हास घेऊन पेंटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

 

निवडणूक आयोगाच्या २ नोटिसा!

ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने ७ आणि ८ एप्रिल अशा दोन नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्यावर ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर आयोगाने प्रचारबंदीची कारवाई केली. “ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभांमध्ये केलेली वक्तव्य लोकांना उद्युक्त करणारी होती ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा येत आहे”, असं आयोगाने पाठवलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

वाचा सविस्तर : ममता बॅनर्जींवर २४ तासांची प्रचारबंदी!

“लोकशाहीसाठी काळा दिवस”

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिली आहे. “आज भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. ते आम्हाला पराभूत करू शकत नाहीत, म्हणून त्यांनी आमच्यावर बंदी घातली आहे”, असं ओब्रायन म्हणाले आहेत.

पहिल्या सभेत हिंदू-मुस्लिम भाष्य!

ममता बॅनर्जी यांनी ३ एप्रिल रोजी हुगळीमध्ये प्रचारसभेत भाषण करताना अल्पसंख्यकांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. “मी माझ्या अल्पसंख्य बंधु आणि भगिनींना हात जोडून विनंती करते, की त्यांनी भाजपाकडून पैसे घेऊन बोलणाऱ्या सैतानाचं ऐकून अल्पसंख्य मतांचं विभाजन होऊ देऊ नका. लक्षात ठेवा जर भाजपा सत्तेत आली, तर तुम्ही गंभीर संकटात सापडाल. मी माझ्या हिंदू बंधू-भगिनींनाही हेच आवाहन करेन”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

कूच-बेहरमध्ये झाला होता हिंसाचार, ५ जणांचा मृत्यू

दुसऱ्या सभेत CAPF संदर्भात वक्तव्य!

७ एप्रिल रोजी कूच बेहरमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी सीएपीएफ या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना घेराव घालण्यासंदर्भात विधान केलं होतं. “जर सीएपीएफकडून अडथळे केले गेले, तर तुम्ही महिलांनी एक गट करून त्यांना घेराव घाला आणि दुसऱ्या गटाने मतदान करायला जा. तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. जर तुम्ही सर्वजण त्यांना अडवण्यासाठी गेलात, तर त्यांना आनंदच होईल की तुम्ही मत दिलं नाही. हाच त्यांचा आणि भाजपाचा प्लॅन आहे”, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं होतं.