यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देण्यात आलं होतं. यासंदर्भातल्या याचिकांवरची सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यूजीसीला या संदर्भात उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढील सोमवारपर्यंत टळली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. युवासेनेनेही या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?
देशात करोना संकट उद्भवलेलं असतानाच विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय ऐरणीवर आला आहे. अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचं या नव्या सूचनांमध्ये म्हटलं आहे. या नव्या सूचना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका केंद्र शासित प्रदेशासह १३ राज्यातील विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्रातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली युवा सेनेनंही युजीसीच्या आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र ती आता पुढील सोमवारपर्यंत टळली आहे.