करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक देशांमध्ये परदेशी नागरिक अडकून पडले आहेत. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने परदेशी नागरिकांना मायदेशात परत जाता येत नाहीय. भारतामध्येही परदेशातून येणाऱ्या प्रवासी विमानांना बंदी घालण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून ही बंदी कायम आहे. मात्र आता हळूहळू सेवा पुन्हा सुरु करण्यात येत असल्याने लवकरच या नागरिकांना आपल्या देशात जाता येणार आहे. असं असलं तरी एका ७४ वर्षीय अमेरिकन नागरिकाला मायदेशात जाण्यामध्ये स्वारस्य नसल्याचं दिसत आहे. जॉन पॉल पियर्स असं या व्यक्तीचं नाव आहे. ७४ वर्षीय जॉन हे मागील पाच महिन्यापासून केरळमधील कोच्ची येथे वास्तव्यास असून त्यांना आता अमेरिकत परत जायचं नाहीय.

करोनाचा जगभरामध्ये फैलाव होण्याआधी जॉन भारतामध्ये आले होते. आता त्यांना आपलं उरलेलं आयुष्या भारतामध्येच घालवायचं आहे. यासंदर्भात त्यांनी आता केरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. आपल्याला देण्यात आलेल्या टुरिस्ट व्हिसा हा बिझनेस व्हिजामध्ये बदलून देण्यात यावा अशी मागणी जॉन यांनी केली आहे. यासंदर्भात जॉन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. याच याचिकेमध्ये जॉन यांनी अमेरिकेमध्ये सध्या गोंधळ उडाल्याचेही नमूद केलं आहे. करोनाची साथ नियंत्रणामध्ये आणण्यासाठी भारत सरकार ही अमेरिकन सरकारपेक्षा चांगलं काम करत असल्याचेही जॉनने आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. “अमेरिकेमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. तेथील सरकार भारत सरकारप्रमाणे काळजी घेत नाहीय. त्यामुळे मला इथेच रहायचं आहे,” असं जॉन यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

“मला इथेच रहायचं आहे. मी आता अर्ज केला असून मला किमान १८० दिवस तरी केरळमध्ये राहू द्यावं अशी मी विनंती केली आहे. मला बिझनेस व्हिसा मिळाल्यास मी इथे एक पर्यटनाशी संबंधित कंपनी सुरु करणार आहे. माझ्या कुटुंबानेही इथं यावं असं मला वाटतं. इथे जे काही घडत आहे ते पाहून मी प्रभावित झालो आहे,” असंही जॉन यांनी म्हटलं आहे.

भारतीय नियमांप्रमाणे टुरिस्ट व्हिजाची मर्यादा ही १८० दिवसांची असते. जॉन यांचा व्हिसा २४ ऑगस्ट रोजी संपणार असल्याने त्यांनी याचिका करुन मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.