ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्राझेनेका संशोधित आणि सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ‘कोविशिल्ड’ या लसीवर भारतानं पुढील काही महिन्यांसाठी निर्यात बंदी केली आहे, अशी माहिती सीरमचे प्रमुख अदर पूनावाला यांनी रविवारी दिली. पूनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे १०० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

या वर्षात तयार होणाऱ्या बहुतेक लसी या श्रीमंत देशांनी राखून ठेवल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून प्रामुख्याने विकसनशील देशांसाठी डोस तयार केले जातात. भारतानं निर्यातबंदी केल्याने गरीब देशांना आणखी काही काळ लसीच्या पहिल्या डोससाठी वाट पहावी लागणार आहे, असल्याचे पूनावाला म्हणाले.

आता लसीकरणाची प्रतीक्षा

भारतीय नियामक मंडळाने रविवारी कोविशिल्डच्या आत्पकालिन वापरासाठी परवानगी दिली. मात्र, यासाठी एक अट घालण्यात आली आहे, ती म्हणजे भारतातील मोठ्या लोकसंख्येला या लसीद्वारे सुरक्षा प्राप्त झाल्याचे निश्चित होईपर्यंत सीरमला ही लस निर्यात करता येणार नाही, अदर पूनावाल यांनी असोसिएट प्रेसशी फोनवरुन संवाद साधताना ही माहिती दिली. त्याचबरोबर कंपनीला खासगी बाजारातही ही लस विकण्यास बंदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षणी आम्ही केवळ भारत सरकारलाच ही लस देऊ शकतो तसेच या लसीची होर्डिंगद्वारे जाहिरात करण्यासही परवानगी देण्यात आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

लसमान्यतेचे निकष जाहीर करा!

पूनावाला म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटकडून ३०० ते ४०० मिलियन डोसचा मोठा करार करण्याची प्रक्रिया सुरु होती. १०० मिलियन डोसचा एक करार आणि नोवोवॅक्ससोबत झालेला एक करार याव्यतिरिक्त हा करार आहे. या आठवड्यात हा करार अंतिम होईल”

डोसची सरकारी आणि खासगी किंमत इतकी असेल

पूनावाला म्हणाले, पहिले १०० मिलियन डोस हे भारत सरकारला विकले जातील. ज्याची खास किंमत २०० रुपये (२.७४ डॉलर) प्रति डोस असेल. त्यानंतर या डोसची किंमत वाढेल. खासगी बाजारात लसीची किंमत १००० रुपये प्रति डोस असेल. भारत सरकारसोबत करार अंतिम झाल्यानंतर ७ ते १० दिवसांत भारतातील राज्यांना गरजेप्रमाणे लस देण्यात येईल.

सध्या सर्वांना लस नाही, प्राधान्यक्रम गरजेचा

डिसेंबर २०२१ पर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनच्या कोवॅक्सला २०० ते ३०० मिलियन डोस देण्याची योजना कंपनीकडून आखली जात असल्याचेही यावेळी पूनावाला यांनी सांगितले. दरम्यान, भारत सरकार आणि कोवॅक्सला डोस देताना कंपनीला संतुलित वितरण करावे लागणार आहे. सध्या आपण सर्वांना लस देऊ शकत नाही, आपल्याला प्राधान्यक्रमानेच लस द्यावी लागणार असल्याचेही पूनावाला यावेळी म्हणाले.