माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आपणही सीताराम केसरी यांच्याप्रमाणे दलित असून मोदी माझ्यावर अन्याय का करत आहेत, असा सवाल केला आहे. ज्या लोकांना अजून माझ्या टीकेचा अर्थ कळत नाही. मी त्यांना आता संपूर्ण गोष्ट सांगतो. सीताराम केसरी दलित नव्हते ते ओबीसी होते. मोदींनी त्यांना दलित म्हटले आहे. देशाला असा अशिक्षित पंतप्रधान पाहिजे का ? हे ट्विट करण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी एक ट्विट केले होते. मोदी आपल्या लोकशाहीतील सर्व संस्थांबरोबर युद्ध का करत आहेत, कोणत्याही व कशाही पद्धतीने त्यांना जे हवे ते मिळवत आहेत. हे महत्वाचे नाही. पण यामुळे आपल्या देशातील राजकारणाचे नुकसान होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

पंतप्रधान मोदींनी सीताराम केसरींना दलित म्हटले होते, त्यावरुन सिन्हा यांनी टीका केली होती. छिंदवाडा येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले होते की, सोनिया गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्यासाठी दलित समाजाचे नेते सीताराम केसरी यांना बाहेर उचलून फेकण्यात आले होते. देशाला माहीत आहे की, सीताराम केसरी यांच्यासारख्या दलित, पीडित आणि शोषित समाजातून आलेल्या व्यक्तीला बळजबरीने कसे हटवण्यात आले होते ? स्वच्छतागृह कसे बंद करण्यात आले होते ? त्यांना फुटपाथवर कसे फेकण्यात आले होते. त्यानंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष बनल्या होत्या. काँग्रेसने गांधी-नेहरु कुटुंबाबाहेरील व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत पक्षाचा अध्यक्ष बनवावे असे आव्हान दिले होते.

काँग्रेसनेही मोदींच्या चुकीच्या वक्तव्याला उत्तर दिले होते. काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधानांनी पुन्हा चूक केली आहे. केसरीजी दलित नव्हे तर वैश्य समुदायातून ते येत होते. केसरींनी स्वत: काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. मी त्यावेळी त्यांचा राजकीय सल्लागार होतो. मला हे सर्व माहीत आहे, असे ते म्हणाले होते.