उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला आज उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं. मात्र या एन्काउंटरसंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर थेट राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतर योगी यांनी एकाही पोलिसावर कारवाई करण्यासंदर्भातील आदेश दिले नाहीत याचा अर्थ योगी आणि दुबे यांचे काही लागेबांधे होते असा घ्याययला वाव असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे. प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

नक्की पाहा >> हैदराबाद ते कानपूर: फिल्मी स्टाइल एन्काउंटरची खरीखुरी उदाहरणे

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. या बातमीनंतर ट्विटवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. काही जण त्यांचे कौतुक करत आहेत तर काहींनी या एन्काउंटवरुन प्रश्न उपस्थित करत योगींवर टीका केली आहे. प्रशांत भूषण यांनाही योगींवर टीका करताना एक ट्विट केलं आहे.

नक्की वाचा >> विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर योगी आदित्यनाथ चर्चेत

“जर आदित्यनाथ यांनी विकास दुबेच्या खोट्या एन्काउंटरमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले नाहीत तर हा एन्काउंटर त्यांच्या आशिर्वादानेच झाल्याचे स्पष्ट होईल. याचा अर्थ आदित्यनाथ यांचे दुबेशी लागेबांधे होते,” असं ट्विट प्रशांत भूषण यांनी केलं आहे.

ट्विटरवर #YogiAdityanath हा हॅशटॅग सकाळपासूनच ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबर योगी यांच्या समर्थकांनी #Yogiroxx म्हणजेच योगींनी कमाल केली अशा अर्थाचा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. यापैकी #YogiAdityanath या हॅशटॅगवर योगी सरकारच्या राज्यात घडलेल्या या एन्काउंटरवरुन दोन्ही बाजूची मते मांडली जात आहेत.