उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका व्यक्तीने त्याचा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल मिळवण्यासाठी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. अमित कुमार असं या तरुणाचं नाव असून त्याने २००३ साली वयाच्या २३ व्या वर्षी बी. एडची परीक्षा दिली आणि तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. या परीक्षेनंतर आपला आग्र्यातील आरबीएस कॉलेजशी असणारा संबंध संपला असं अमितला वाटलं होतं. मात्र मागील १७ वर्षांपासून तो नियमितपणे कॉलेजला जात आहे केवळ आपल्या पदवी परीक्षेचे प्रशस्तीपत्रक मिळवण्याच्या आशेने.
अमित आज ४० वर्षांचा झाला आहे. मागील १७ वर्षांमध्ये काळ बराच पुढे लोटला आहे. अमितचं लग्न झालं त्याला तीन मुलं झाली मात्र त्याला पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र मिळाले नाही. आपण कोणालाही लाच न देताना आपले पदवीचे प्रमाणपत्र मिळवून दाखवू अशी भूमिका अमितने घेतल्याने त्याला एवढ्या वर्षानंतरही अजून प्रमाणपत्र मिळालेलं नाही असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दिल्लीतील हैदरपूर परिसरात राहणाऱ्या अमितने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधान मोदींनी लाच न देता माझे बॅचलर्स ऑफ एज्युकेशनचे (बी. एड) प्रमाणपत्र मिळवून दाखवावे असं आव्हानच अमितने या पत्रातून केलं आहे. मागील १७ वर्षांपासून सतत कॉलेजच्या फेऱ्या मारुनही काहीच काम होत नसल्याने अमित आता निराश झाला असून मला माझं पदवी प्रमाणपत्र मिळालं नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकीही त्याने दिली आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, विद्यापिठाचे कुलगुरु आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आपण पत्र लिहिलं आहे मात्र आपल्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही असंही अमित सांगतो.
“या सर्व गोष्टीला आता १७ वर्षे झाली आहेत. मी सर्व मार्ग वापरुन पाहिले. मात्र आता मला न्याय मिळेल या आशेने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. माझ्या पदवीचं प्रमाणपत्र देण्यासाठी तेथील कर्मचारी २० हजारांची लाच मागत असून ती देण्याची माझी ऐपत नाही. मी क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करुन कसं तरी माझ्या कुटुंबाचे पोट भरतो. माझ्याकडे प्रमाणपत्र नसल्याने मला कुठेही शिक्षकाची नोकरी मिळथ नाहीय,” असं अमितने म्हटलं आहे.
यासंदर्भात विद्यापिठाचे उप-कुलगुरु असणाऱ्या अशोक मित्तल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी, “मला अमित कुमार यांच्या प्रकरणाबद्दल कल्पना आहे. पदवीची प्रमाणपत्रे वेळेत मिळावित म्हणून आम्ही संपूर्ण यंत्रणा अद्यावत करत आहोत. अमितलाही लवकरच प्रमाणपत्र दिलं जाईल,” असं सांगितलं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या ५० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप त्यांची पदवीची प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.