scorecardresearch

मैदानात कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडूंना बाहेर काढणं IAS दांपत्याला महागात पडलं; गृहमंत्रालयाने पतीची लडाखला केली बदली तर पत्नी…

प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला, अहवाला सादर झाल्यानंतर लगेच गृहमंत्रालयाने आदेश जारी केले

Sanjeev Khirwar
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आदेश (फाइल फोटो सौजन्य ट्विटर आणि इंडियन एक्सप्रेस)

राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकाऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्टेडियम सोडण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील त्यागराज स्डेडियमवर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशिक्षण घेणारे खेळाडू तसेच त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून देशभरातून या प्रकरणावरुन खेळासंदर्भातील गांभीर्याबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. असं असतानाच आता हे प्रकरण या आयएएस अधिकारी असणाऱ्या दांपत्याला महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारित येणाऱ्या गृहखात्याने या प्रकरणातील आयएएस दांपत्याची बदली केली आहे. या प्रकरणातील  दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिव संजीव खिरवार यांची पोस्टींग लडाखला करण्यात आलीय तर त्यांची पत्नी रिंकू डग्गू यांची अरुणाचलमध्ये बदली करण्यात आलीय.

दिल्ली शहरातील त्यागराज स्टेडियम राज्य सरकारच्या मालकीचे आहे. या स्टेडियमची देखभाल सरकारकडून केली जाते. २०१० कॉमनवेल्थ गेम्ससाठी हे मैदान तयार करण्यात आले होते. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे खेळाडू सरावासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या स्टेडियमवर सायंकाळी सात वाजल्यानंतर दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिन संजीव खिरवार आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला येतात. त्यामुळे या खेळाडूंना वेळेच्या आधीच म्हणजेच संध्याकाळी सात वाजता खेळ आणि सराव बंद करुन मैदान सोडण्यास भाग पाडण्यात येत आहे. एका आएएस अधिकाऱ्याला कुत्र्यासोबत फिरायला यायचं असल्यामुळे सर्वच खेळाडूंना मैदान खाली करायला सांगितले जातेय. या प्रकारामुळे रोष व्यक्त केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत सविस्तर वृत्त दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली आणि कारवाईची सूत्र हलली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने १९९४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी संजीव खिरवार यांची लडाखला नियुक्ती केलीय. तर त्यांच्या पत्नीची नियुक्ती अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आलीय. त्यागराज स्टेडियमवरील प्रकरणानंतर अवघ्या काही तासांमध्ये हे फेरनियुक्तीचे आदेश जारी करण्यात आलेत. तातडीने हे निर्देश लागू होतील असंही गृहखात्याने जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटलंय.

समोर आलेल्या माहितीनुसार, गृहखात्याने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडे या प्रकरणासंदर्भातील वृत्तामध्ये म्हटल्याप्रमाणे त्यागराज स्टेडियमवरील सेवांचा खिरवार आणि त्यांच्या पत्नीकडून गैरवापर झालाय का यासंदर्भातील अहवाल मागवला. हा अहवाल काही तासांमध्ये सादर करण्यात आल्यानंतर लगेच या दांपत्याची नियुक्ती दिल्लीबाहेर करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या ताब्यातील सर्व मैदाने आणि खेळांसंदर्भातील सुविधा रोज रात्री दहा वाजेपर्यंत खेळाडूंसाठी उपलब्ध असतील अशी खबरदारी घ्यावी असे निर्देश दिलेत. “माझ्या असं निदर्शनास आलं आहे की, उष्णतेमुळे खेळाडूंना सरावामध्ये अडचणी येत आहेत आणि सर्व सेवा सायंकाळी सहा ते सातपर्यंत बंद केल्या जातात. आम्ही सर्व खेळांविषयक सेवा रात्री १० पर्यंत सुरु रहाव्यात यासंदर्भातील निर्देश दिले असून रात्री १० पर्यंत खेळाडूंना या सेवांचा वापर करता येणार आहे,” असं केजरीवाल म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After dog walking row at thyagraj stadium bureaucrat sanjeev khirwar transferred to ladakh wife rinku dugga to arunachal scsg

ताज्या बातम्या