मुख्यमंत्री ममतांच्या अल्टिमेटमनंतरही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

तीन सहायक प्राध्यापकांसह एक प्राध्यापक व चार निवासी डॉक्टरांनी दिला राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये बुधवारपासून सुरू असलेले डॉक्टरांचे आंदोलन थांबत नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना तातडीने कामावर रूजू होण्यास सांगितले होते, शिवाय यासाठी चार तासांची मुदतही दिली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांचा आदेश न जुमानता सामुहिक राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय डॉक्टारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयास तसेच रूग्णालयास पुरेशी सुरक्षा पुरवली जावी, एनआरएस रूग्णालयात १० जुन रोजी डॉक्टरांवर हल्ला करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशा मागण्या केल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही कामावर रूजू होऊ असे देखील सांगण्यात आले आहे.

ज्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला, ते बाहेरचे होते. मी पोलिसांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यांनी संबंधित लोकांना अटक केली आहे, असे मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी एसएसकेएम रूग्णालयातील डॉक्टरांना सांगितले होते. तसेच डॉक्टर संपावर जाऊ शकत नाहीत, त्यांना रुग्णांची सेवा करावी लागेल. हे मनोरंजन चालणार नाही. असे सांगत जे डॉक्टर चार तासांच्या आत कामावर रूजू होणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही म्हटले होते.

ममतांच्या या अल्टीमेटमनंतर परिस्थिती अधिच चिघळली सागर दत्ता रूग्णालयाच्या तीन सहाय्यक प्राध्यापकांसह एका प्राध्यापकाने व चार निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला. कनिष्ठ डॉक्टरांच्या या आंदोलनात आता वरिष्ठ डॉक्टरांनी देखील भाग घेतला आहे. डॉक्टरांच्या संपामुळे ब़ुधवारपासून बंद झालेली आरोग्यसेवा गुरूवारी देखील बंद होती. यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. मंगळवारी एका रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी एका निवासी डॉक्टरला मारहाण केली होती. या प्रकारामुळे चिडलेल्या अन्य डॉक्टरांनी बुधवारी सकाळी ९ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत काम बंद केले होते. केवळ आपत्कालीन विभाग सुरू होता. त्यांनतर गुरूवारी देखील हे आंदोलन सुरूच होते.

डॉक्टरांच्या कडक भूमिकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी नरमाइची भूमिका घेत, राज्यभरातील सर्व ज्येष्ठ डॉक्टर, वैद्यकीय महाविद्याल व रूग्णालयांच्या प्राध्यपकांना एका पत्राद्वारे भावनिक आव्हान केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, कृपया सर्व रूग्णांची काळजी घ्या, विविध जिल्ह्यांमधुन गोरगरिब रूग्ण आलेले आहेत. जर तुम्ही तुम्ही सगळ्यांनी रूग्णालयांची काळजी घेतली तर मला तुमचा अभिमान वाटेल. ही सर्व रूग्णालय शांततेत व व्यवस्थितरित्या चालली पाहिजेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After the ultimatum of chief minister mamata the movement of doctors continued msr87

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या