सोनिया गांधी यांचा पाठिंबा असल्याचा दावा

जमीन बळकावण्याच्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पंजाब काँग्रेसच्या प्रभारी आशाकुमारी यांनी सोमवारी राजीनाम्याची मागणी सपशेल फेटाळली. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे आशाकुमारी म्हणाल्या.

आशाकुमारी यांची पंजाब काँग्रेसच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे, आशाकुमारी यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन भाजप, आप आणि शिरोमणी अकाली दल निर्थक वाद निर्माण करीत असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण राजीनामा देणार नाही, असे त्यांनी यावेळी वार्ताहरांना ठामपणे सांगितले.

पंजाबमध्ये पक्षासाठी काम करावे यासाठी सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आपल्याला पाठिंबा दिला आहे. आशाकुमारी या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या नातेवाईक आहेत. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात त्या दोषी असल्याचे प्रकरण उघड झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून सध्या त्या जामिनावर सुटल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.