माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना आपण रोज वाचत. पाहात असतो. यातल्या बहुतांशी घटनांमध्ये गुन्हेगार सहभागी असतात. पण सामान्यांच्या रक्षणाची, त्यांच्यात विश्वासाची भावना निर्माण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जेव्हा अशा घटनांमध्ये सहभागी असल्याचं दिसतं, तेव्हा त्याची गंभीर दखल समाजाला घ्यावीच लागते. बिहारमधल्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट पुलावरून खाली ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

रविवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये काही पोलीस एक मृतदेह रस्त्यावरून फरपटत नेताना दिसत आहेत. एका पुलावर हे पोलीस असून त्यांनी मृतदेह पुलाच्या कठड्यावरून खाली ओढ्यात फेकून दिल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं घडत असताना आसपासच्या नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. शिवाय, मृतदेह फेकून मागे फिरणारे पोलीस एखादी कचऱ्याची पिशवी खाली फेकल्याच्या आविर्भावात निवांत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओ नेमका कुठला?

फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बिहारमधला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधल्या फाकुली ओपी भागातली ही घटना आहे. या परिसरातील धोधी ओढ्यावरच्या पुलावर एक अपघात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ८ ऑक्टोबर रोजी, अर्थात रविवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, मृतदेहाचे काही भाग व कपडे एकात-एक अडकले होते. ते काढणं अशक्य झाल्यामुळे ते बाजूच्या ओढ्यात फेकून देण्यात आले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांविषयी संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, अशा प्रकारे मृतदेह किंवा मृतदेहाचे भाग ओढ्यात फेकून देण्याची मानसिकता असणाऱ्या पोलिसांवर टीका होऊ लागली आहे बिहार पोलिसांच्या या अमानवी कृत्यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.