अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासंदर्भात देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहे. मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यात ८.७ टक्के वाढ झाली असून देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश आहे. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे.

देशात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातही महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याचे १ लाख ६२ हजार ४४९ गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार आणि अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २० हजार ७६२ गुन्हे दाखल असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात २० हजार ४१५ गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात (१८,६८२), राजस्थानमध्ये (९३७०) आणि पाचव्या स्थानावर असलेल्या ओडिशात ८ हजार २४० गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशात (९९९) सर्वाधिक अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर केरळ राज्यात ९३० अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तेलंगणात ११३ मुलींशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या १४ घटना घडल्या आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून तब्बल ३७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

हेही वाचा >>>दहावीच्या विद्यार्थ्याला वर्गमित्रांकडून विवस्त्र करत मारहाण, दारू पिण्यासही भाग पाडलं

हत्याकांडात मोठी वाढ ..

१८ वर्षांखालील मुला-मुलींवर प्राणघातक हल्ला करून खून केल्याच्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २४० अल्पवयीन मुला-मुलींचा खून करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात १३९ मुलांचे हत्याकांड झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या मध्यप्रदेशात ११२ मुलांचे हत्याकांड घडले आहेत. महाराष्ट्रात सातत्याने गुन्हेगारी वाढत असून लहान मुलांच्याही हत्याकांडात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत ३ हजार १७४ गुन्हे

राज्यात मुलांवर अत्याचारच्या सर्वाधिक घटना मुंबईत घडल्या आहेत. मुंबईत तब्बल ३ हजार १७४ गुन्हे दाखल असून अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे. नागपुरात ७६५ गुन्हे दाखल असून नागपुरात २०२१ मध्ये ९३६ गुन्हे दाखल होते. तिसऱ्या स्थानावर पुणे असून पुण्यात ७३२ दाखल आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children are most abused in maharashtra nagpur amy
First published on: 22-12-2023 at 03:50 IST