दिल्ली पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी केला होता. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनीही एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांच्या आई-वडिलांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, यासंदर्भात आता दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

टाईम्सनाऊने दिलेल्या वृत्तानुसार, स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांची चौकशी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तत्पूर्वी सकाळी आप नेत्या आतिशी यांनी चौकशीच्या नावाखाली अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा – दिल्ली, पंजाब, गोव्याची जनता पाकिस्तानी? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहांवर हल्लाबोल

आतिशी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

“जेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. तेव्हापासून त्यांना त्रास देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. आता तर अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांनादेखील त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. केजरीवाल यांच्या आईची प्रकृती बरी नाही, तर त्यांच्या वडिलांच्या डोळ्याने दिसत सुद्धा नाही. पंतप्रधान मोदी हे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. याचं उत्तर दिल्लीतील जनता देईल. दिल्ली पोलीस हे भाजपाच्या हातातलं बाहुलं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

संजय सिंग म्हणाले…

याशिवाय आप नेता संजय सिंग यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट करत थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं होतं. “मोदीजी कृपया अरविंद केजरीवाल यांच्या आजारी आणि वृद्ध आई-वडिलांकडे बघून त्यांनी काही गुन्हा केला असेल असे वाटते का? तुमचा लढा अरविंद केजरीवाल यांच्याशी आहे. मग त्यांच्या आई-वडिलांना पोलीस का छळत आहे? संपूर्ण देश तुमचे अत्याचार पाहत आहे, जनता तुम्हाला उत्तर देईल”, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अरब राष्ट्रांमधून AAP ला अवैध निधी; ईडीने गृहमंत्रालयाला सोपवला अहवाल

अरविंद केजरीवाल यांनीही केली होती पोस्ट :

अरविंद केजरीवाल यांनीही आज सकाळी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांच्या आई वडिलांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितल्याचे सांगितले होते. “मी माझे आई-वडील आणि पत्नी बरोबर दिल्ली पोलिसांची वाट बघतो आहे. काल दिल्ली पोलिसांनी फोन करून आई वडिलांच्या चौकशीसाठी वेळ मागितली होती. मात्र, मला माहिती आहे, की दिल्ली पोलीस येणार नाही. त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही”, असे ते म्हणाले.