नवी दिल्ली : बडतर्फ खासदार राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्या जर्मनीचे आभार मानणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसला पुन्हा अडचणीत आणले. राहुल गांधी यांना दोषी ठरवल्याची आम्ही दखल घेतली आहे असे जर्मनीने सांगितले. त्यानंतर  दिग्विजय सिंह यांनी याबद्दल जर्मनीचे आभार मानले, ही संधी साधून भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष्य केले, तर काँग्रेसने दिग्विजय यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवले. 

राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या निकालाची तसेच, त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या घटनेची आम्ही दखल घेतली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयीन स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व या दोन्हींचे पालन होणे अपेक्षित होते, अशी टिप्पणी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तसेच लोकशाहीचे मूलतत्त्व पाळले गेले पाहिजे, असे म्हणत या संपूर्ण घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही, राहुल गांधींशी संबंधित घडामोडींवर आम्ही नजर ठेवून आहोत, असे म्हटले होते.

देशांतर्गत लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी इतर राष्ट्रांच्या मदतीची गरज नाही. त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली नव्हती, असे स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिले असतानाही, दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या प्रकरणाची दखल घेतल्याबद्दल जर्मनीचे आभार मानले. दिग्विजय यांच्या ट्वीटमुळे भाजपच्या हाती कोलित मिळाले. भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ‘देशाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परराष्ट्रांना आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्वीट रीजिजूंनी केले. तर ‘देशाच्या लोकशाहीशी निगडित प्रश्न, राजकीय तसेच कायद्याशी संबंधित समस्या सोडवण्याची क्षमता राहुल गांधी आणि काँग्रेसकडे नसल्याने परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे’, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला.

काँग्रेस अलिप्त

दिग्विजय सिंह यांच्या नव्या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वत:ला अलिप्त ठेवले. पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी कोणाचेही नाव न घेता, देशांतर्गत लोकशाहीसंबंधित प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवले जावेत यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे असे ट्वीट केले.

देशांतर्गत लोकशाहीसंबंधित प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवले जावेत यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे. मोदींनी घटनात्मक संस्थांवर केलेला हल्ला, त्यांचे विद्वेषाचे राजकारण, धमक्या आणि छळ याविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष निडरपणे लढा देतील.                

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– जयराम रमेश, माध्यम विभागप्रमुख, काँग्रेस

देशातील सत्ताबदलासाठी काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी केली. परदेशातून मदत मिळू लागल्यामुळे त्यांचे आभार मानले जात आहेत. आता आणखी कोणता पुरावा पाहिजे?                                      

– निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री