सध्या देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे.

रेल्वे विभागाने सणासुदीनिमित्त या वर्षी छठपूजेपर्यंत १७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या विशेष रेल्वे २ हजार २६९ फेऱ्या करणार आहेत. रेल्वेमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, प्रवाशांसाठी सणासुदीच्या काळातील प्रवास आरामदायी होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने छठपूजेपर्यंत विशेष ट्रेनच्या २ हजार २६९ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भात मंगळवारी अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि या सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभाग छठपूजेपर्यंत १७९ जोडी विशेष गाड्यांच्या २ हजार २६९ फेऱ्या चालवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, दिल्ली-पाटणा, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्परपूर, दिल्ली-सहरसा इत्यादी देशभरातील प्रमुख ठिकाणांना जोडण्यासाठी विशेष ट्रेनची योजना तयार करण्यात आली आहे. अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांच्या पद्धतशीर प्रवेशासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत स्थानकांवर रांगा तयार करून गर्दीचे नियंत्रण केले जात आहे.