इस्रायल-इराणमधील संघर्ष आता निवाळल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरं तर काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. या संघर्षात भर घालत अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ आण्विक तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे तीन आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. इस्रायल-इराणमधील संघर्षात अमेरिका उतरल्यामुळे अवघ्या जगाला चिंता लागली होती. मात्र, त्यानंतर अमेरिकेने इराण-इस्रायलमधील युद्धसमाप्तीची घोषणा केली आणि दोन्ही देशातील तणाव निवाळला आहे.

दरम्यान, इस्रायलबरोबरील संघर्षाच्या शस्त्रविरामानंतर आता इराणने एक मोठं पाऊल उचललं आहे. इस्रायलबरोबर झालेल्या संघर्षानंतर आता इराण चीनकडून जे-१० सी हे लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेच्या डझनभर लढाऊ विमानांनी इराणच्या हद्दीत घुसून बॉम्बहल्ला केला होता, तेव्हा इराणच्या हवाई दलाने कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नसल्याचं सांगितलं जातं.

एवढंच नाही तर इराणला इस्रायल आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आडवताही आलं नव्हतं. त्यामुळे आता इराण आपलं हवाई दल अधिक ताकदवान बनवण्यासाठी अनेक महत्वाची पावलं उचलत असल्याचं बोललं जात आहे. या अनुषंगानेच इराण चिनकडून जे १० सी हे लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

रशियाबरोबर एसयू-३५ या विमानांसाठी झालेल्या अयशस्वी करारानंतर इराणने आता आपला मोर्चा चीनकडे वळवला असून इराण चीनकडून जे १० सी हे लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी हालचाली करत आहे. इराणने रशियाकडून लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार केला होता. पण २०२३ च्या करारापासून ५० एसयू-३५ जेट्सपैकी फक्त चार विमाने मिळाल्यामुळे आता इराण चीनकडून लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चीनच्या चेंगडू एरोस्पेस कॉर्पोरेशनने विकसित केलेलं जे-१० सी हे लढाऊ विमान इराणने खरेदी केल्यास ते इराणच्या हवाई दलासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची शक्यता आहे. कारण लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेलं जे-१० सी हे लढाऊ विमान आहे. तसेच काही प्रमाणात इस्रायलच्या काही फ्रंटलाइन जेट्सशी देखील या लढाऊ विमानांची तुलना करता येईल.