Maharashtra Tourist raped in Pahalgam: पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले होते. यापैकी २५ लोक पर्यटक होते. तर एक व्यक्ती स्थानिक होता. याच दरम्यान एप्रिलमध्ये पहलगाम येथे आणखी एक घटना घडली होती. महाराष्ट्रातून कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेल्या एका ७० वर्षीय महिलेवर पहलगाम येथील हॉटेलमध्ये बलात्कार करण्यात आला होता. आरोपीच्या जामीन अर्जावर नुकतीच अनंतनाग न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ही घटना नैतिक अध:पतन असल्याचे सांगून न्यायाधीशानी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

अनंतनाग न्यायालयाचे न्यायाधीश ताहिर खुर्शीद यांनी प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले की, आरोपाचे गांभीर्य, तपासातील तथ्य आणि पुराव्यांचा विचार करता या टप्प्यावर आरोपीस जामीन देणे योग्य ठरणार नाही. तसेच ही घटना अतिशीय हीन आणि बुरसटलेल्या मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी म्हटले.

न्यायाधीश ताहिर खुर्शीद यांनी पुढे म्हटले की, जोपर्यंत समाजाचा नैतिक पाया आणि त्याच्या नैतिक चारित्र्याची पायाभरणी पुन्हा केली जात नाही, तोपर्यंत येथील कुरण, पर्वत, नद्या आणि बागा येथील पर्यटन वाचवू शकणार नाहीत. सदर गुन्हा गंभीर असून आरोपी पळून जाण्याचा संभाव्य धोका आहे, तसेच पुराव्यांशी छेडछाड केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, पहलगाम या प्रसिद्ध पर्यटन स्थळी पीडित महिला कुटुंबियांसह एका हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी आरोपीने पीडिता एकटी असताना तिच्या खोलीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तिचे तोंड ब्लँकेटने बांधले आणि बलात्कार केला. यानंतर महिलेला जखमी करून आरोपी खिडकीतून पळून गेला.

हा हल्ला इतका जबर होता की, पीडित महिलेला बसताही येत नव्हते. अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान आरोपीने त्याच्या वकिलामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी पूर्वग्रहदूषित भावनेतून या गुन्ह्यात अडकवले असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. तसेच पोलिसांनी ओळख परेड केलेली नाही, याकडेही आरोपीने लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान न्यायाधीशांनी नमूद केले की, केस डायरी फाईलमध्ये ज्येष्ठ नागरिक महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड होत आहे. हा गुन्हा अत्यंत घृणास्पद पद्धतीने करण्यात आला आहे. काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेली महिला आयुष्यभराचे दुःख घेऊन गेली, असेही त्यांनी नमूद केले.