पीटीआय, कोलकाता
कोलकाता येथील विधि अभ्यासक्रमाच्या २४ वर्षीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींची संस्थेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. महाविद्यालयात कंत्राटी तत्त्वावर अर्धवेळ अध्यापन करणारा मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याचाही यात समावेश आहे. मिश्रासह झैद अहमद, प्रमित मुखर्जी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे आमदार अशोक कुमार देब यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागाची मंगळवारी बैठक झाली. या वेळी मिश्रा याची सेवा रद्द करण्याबरोबरच दोन विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेतील चौथ्या आरोपींत महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या संस्थेलाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याचे देब यांनी पत्रकारांना सांगितले. वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली.
दरम्यान, याप्रकरणी मंगळवारीही निदर्शने करण्यात आली. ‘साऊथ कलकत्ता लॉ कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्याबरोबरच संस्थेच्या प्रशासकीय मंडळात व्यापक सुधारणांची गरज अधोरेखित केली. आरोपी विधि महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत असल्याचे विद्यार्थी म्हणाले.
‘तृणमूल’चे नेते मदन मित्रा यांचा माफीनामा
पीडितेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून तृणमूल काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते मदन मित्रा यांनी मंगळवारी दिलगिरी व्यक्त केली. कथित अत्याचाराच्या घटनेनंतर मित्रा यांनी ‘संबंधित विद्यार्थिनी महाविद्यालयात एकटी का गेली होती’, असा प्रश्न केला होता. या वक्तव्यावरून पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर मित्रा यांनी आपले म्हणणे पक्षासमोर मांडत केलेल्या वक्तव्याबद्दल माफीनामा दिला.