लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावरुन निर्माण झालेल्या वादावर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे. रमजानच्या संपूर्ण महिन्यात निवडणुका स्थगित करणे शक्य नव्हते असे स्पष्ट करत मुख्य सणाचे दिवस आणि शुक्रवारी मतदान नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.

रमजानदरम्यान निवडणुका होतील. कारण संपूर्ण महिना निवडणूक स्थगित करणे शक्य नव्हते. पण, मुख्य सणाचा दिवस आणि शुक्रवारी मतदान होणार नाही, असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने म्हटले.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत होतील. २३ एप्रिलला मतमोजणी होईल. रमजानचा महिना यावर्षी ६ मे रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम समाजात उपवास केला जातो. आयोगाने सीबीएसईसमवेत विविध राज्यातील शिक्षण मंडळांचे परिक्षेचे वेळापत्रक पाहून निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

ते म्हणाले, वेळापत्रक ठरवताना इतर मुद्दे जसे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येणारे विविध सुट्टया आणि सण, मान्सून पूर्व पाऊस, पीक कापणी लक्षात घेण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे फरहाद हकीम आणि आम आदमी पक्षाचे अमानातुल्लाह खान समवेत काही नेत्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात होणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या मुद्याचे वादात रुपांतर झाले होते.

तर दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासह आणखी काही नेत्यांनी रमजानच्या महिन्यात निवडणुका होणे काही गैर नसल्याचे म्हटले होते. जर मुस्लिम उपवासादरम्यान काम करु शकतात. तर उपवासादरम्यान ते मतदानही करु शकतात, प्रचारही करु शकतात, असे ते म्हणाले.