गुजरातमधील वडोदरा येथे सांताक्लॉज बनून आलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनीही या मारहाणीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी यासंदर्भात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही असंही म्हटलं आहे. मंगळवारी हा सारा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

सांताक्लॉजचा पोशाख करुन आलेली व्यक्ती चॉकलेटचं वाटप करत होती. मक्कारपूर येथील एका कॉलिनीमध्ये ही व्यक्ती चॉकलेट वाटप करत होती. या कॉलिनीमध्ये या व्यक्तीच्या ओळखीचे त्याच्याच समाजातील काही लोक राहत असल्याने तो त्यांना भेटायला गेला होता. “काही स्थानिकांनी या व्यक्तीला चॉकलेट वाटप करण्यास मज्जाव करत आक्षेप घेतला. त्यानंतर दोन सामाजातील गटांमध्ये वाद झाला,” अशी माहिती मलकापूर पोलीस स्थानकातील निरिक्षक रशमीन सोलंकी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ख्रिश्चन समाजातील लोकांनी मंगळवारीच पोलीस स्थानकात धाव घेतल्याचंही सोलंकी यांनी सांगितलं. ज्या सायंकाळी हा प्रकार घडला त्यानंतर काही वेळात येथील ख्रिश्चन सामाजातील लोकांनी पोलीस स्थानकामध्ये येऊन कोणत्याही प्रकारच्या धार्मिक मिरवणूकीसाठी आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली. “मी त्यांना सर्व प्रकराची मदत करण्याचं आश्वासन दिलं. दोन्ही बाजूकडी व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची तक्रार या मारहाण प्रकरणासंदर्भात नोंदवली नाही,” असं सोलंकी म्हणाले.