सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांवर आतापर्यंत कारवाई केली आहे. आपचे आमदार अमानतुल्लाह खान हे आता ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने मंगळवारी दिल्लीत अमानतुल्लाह खान यांच्या घरासह, त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात दिल्ली वक्फ बोर्डाच्या कारभारात हेराफेरी आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने अमानतुल्लाह यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

अमानतुल्लाह खान यांनी दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहत असताना अनेक नियमांचं उल्लंघन करत ३२ जणांची बोर्डात भरती केली होती. त्यानंतर दिल्ली वक्फ बोर्डाच्या सीईओंनी या अवैध भरतीविरोधात निवेदन जारी केलं होतं. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून अमानतुल्लाह खान यांनी भ्रष्टाचार आणि भेदभाव केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर वक्फ बोर्डाची संपत्ती अवैध पद्धतीने भाडेतत्वावर दिली आहे. तसेच त्यांनी वक्फ बोर्डाच्या पैशांचा खासगी कामांसाठी वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्ली सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातही भ्रष्टाचार केल्याचा अमानतुल्लाह यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

अमानतुल्लाह खान यांच्यावर वक्फ बोर्डाच्या सीईओंनी आरोप केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमानतुल्लाह यांची चौकशी केली. त्यानंतर यासंबंधीची अधिक माहिती मिळाल्यानंतर आणि अमातुल्लाह यांच्याबद्दलचा संशय बळावल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमानतुल्लाह यांच्याशी संबधित चार ठिकाणांवर छापेमारी केली. यावेळी तब्बल २४ लाख रुपयांची रोकड, दोन अवैध पिस्तूलं, बंदुकीच्या गोळ्या यासह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला. त्यानंतर अमानतुल्लह यांना अटक करण्यात आली होती.

संजय सिंह यांना ५ दिवसांची कोठडी

कथित दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात गेल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली न्यायालयाने ५ दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे. ईडीने सिंह यांच्याशी संबंधित ठिकाणी बुधवारी छापे टाकले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीने संजय सिंह यांच्या चौकशीसाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने १० ऑक्टोबपर्यंत ईडीला सिंह यांची कोठडी दिली.