आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पावसाळी अधिवेशनात विशेष काळजी घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश करताना माध्यमांशी संवाद साधला.

“विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. करोना आहे आणि कर्तव्य सुद्धा बजावायचे आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज वेगवेगळया वेळी होईल. शनिवार-रविवारी सुद्धा संसदेचे कामकाज होईल. सर्व खासदारांनी हे मान्य केले आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे, असा स्पष्ट संदेश संसदेचे सर्व सदस्य देतील असा आपल्याला विश्वास आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“जो पर्यंत औषध येत नाही, तो पर्यंत कोणताही निष्काळजीपणा करु नका. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लवकरात लवकर लस निर्मिती व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आमचे शास्त्रज्ञही यशस्वी ठरले आहेत” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर चर्चा करण्यासंदर्भात काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि के.सुरेश यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. वेगवेळया पक्षाच्या खासदारांनी वेगवेगळया मुद्यांवर चर्चेसाठी नोटीसा दिल्या आहेत.

आणखी वाचा- भारतीय सैन्य लढलं, जिनपिंग यांची आक्रमक चाल फ्लॉप ठरली – अमेरिकन मीडिया

कुठल्या मुद्दांवर चर्चा होणार
चीनशी सुरू असलेला संघर्ष, सीमांवरील सद्यस्थिती, करोना साथरोगाची हाताळणी, देशाची आर्थिक स्थिती, छोटय़ा उद्योगांची बिकट अवस्था, विमानतळांचे खासगीकरण, पर्यावरणीय प्रभावाचा नवा मसुदा या प्रमुख विषयांवर लोकसभेत व राज्यसभेत चर्चेची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. यासंदर्भात विरोधक एकजूट दाखवतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.