जगातील सर्वात उंच असणारं माऊंट एव्हरेस्ट हे शिखर एका नेपाळी गिर्यारोहकाने एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल ३० वेळा सर केलं आहे. या गिर्यारोहकाचे नाव कामी शेर्पा रीता असे असून त्यांनी पुन्हा एकदा स्वत:चा विक्रम मोडला आहे. कामी शेर्पा रीता यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला असून जगासमोर एक मोठं उदाहरण निर्माण केलं आहे. कामी शेर्पा रीता यांची “एव्हरेस्ट मॅन” म्हणून ओळख नर्माण झाली आहे.

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट हे तब्बल ३० वेळा सर करणारे गिर्यारोहक कामी शेर्पा रीता हे एकमेव असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांना प्रसिद्ध गिर्यारोहक म्हणूनही ओळखलं जातं. खरं तर माऊंट एव्हरेस्टवर एकदा जाणंही अवघड समजलं जातं. मात्र, असं असतानाही कामी शेर्पा रीता यांनी तब्बल ३० वेळा हे शिखर सर केलं आहे.

हेही वाचा : ‘मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये ‘या’ गोष्टी बदलणार’, प्रशांत किशोर यांनी काय सांगितलं?

कामी रीता शेर्पा यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. तर त्याचा गिर्यारोहणाचा प्रवास १९९२ मध्ये सुरू झाला होता. ते आधी गिर्यारोहक सहाय्यक कर्मचारी म्हणून शिखराच्या मोहिमेत सहभागी होत असत. त्यांना लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. कामी रिता शेर्पा हे मुळ नेपाळचे आहेत. दरम्यान, त्यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक मानली जाणारी काही शिखरेही सर केली आहेत.

कामी रीता शेर्पा यांचा जन्म जन्म १९७० मध्ये नेपाळमधील थामे भागात झाला. १३ मे १९९४ साली वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. १९९४ ते २०२४ या कालावधीत कामी रीता शेर्पा यांनी तब्बल ३० वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केलं आहे. याआधी सेव्हन समिट ट्रेक्स एव्हरेस्ट मोहीम २०२३ चा भाग म्हणून २९ व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं.

दरम्यान, आता त्यांनी ३० व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करत स्वत:चा विक्रम मोडत इतिहास रचला आहे. याआधी त्यांनी माउंट के २, माऊंट ल्होत्से, माऊंट मनास्लू आणि माऊंट चो ओयू ही शिखरंही सर केली आहेत. कामी रीता शेर्पा यांनी तब्बल ३० वेळा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आता त्यांचं जगभरातून कौतुक होत आहे.