पीटीआय, नवी दिल्ली : देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होण्यास ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी नकार दिला आहे. केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरूवातीला त्यांना हे पद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे रोहतगी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २०१४ ते २०१७ या काळात अ‍ॅटर्नी जनरल राहिलेल्या रोहतगी यांच्याकडे सरकारने विचारणा केली होती. रोहतगी यांच्या नकारानंतर सरकार काय पाऊल उचलणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

रोहतगी यांच्यानंतर वेणूगोपाल अ‍ॅटर्नी जनरल झाले होते. २०२० साली त्यांची ३ वर्षांची मुदत संपली. मात्र महत्त्वाचे खटले लक्षात घेता आणखी एक वर्षांची मुदतवाढ घेण्याची सरकारने विनंती केली. ती वेणूगोपाल यांनी मान्य केली होती. आता पुन्हा ९१ वर्षांच्या वेणूगोपाल यांनी वयोमानामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे मुदतवाढ घेण्यास नकार कळवला आहे.