New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates , 28 May 2023: गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला होता.




Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!
नव्या संसद भवनातील समुद्र मंथन थीममागची संकल्पना काय होती? ऐका थेट नरेश कुमावत यांच्याचकडून!
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.
हे बघा, याचसाठी आपण मतदानातून यांना निवडून दिलं होतं… स्वरा भास्करनं ट्वीट केले दोन फोटो!
नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी बोलावली भाजपाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक
राजदच्या अधिकृत संकेतस्थळावर नव्या संसद भवनाची तुलना शवपेटीशी करणारं ट्वीट करण्यात आलं होतं. त्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला सेंगोलचं महत्त्व सांगणारा संसदेतील व्हिडीओ!
एकीकडे विनेश फोगाटसह आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची पोलिसांनी दिल्लीत धरपकड केली असताना दुसरीकडे तिची बहीण बबिता फोगाटनं नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्ताने गर्व वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे.
पुरुष संतांना आदरानं संसदेत नेण्यात आलं. महिला कुस्तीपटूंना रस्त्यावर धक्काबुक्की करण्यात आली. आनंद? दु:ख? गर्व? शरम? आपल्याला या क्षणी नेमकं काय वाटायला हवं? – अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट
काँग्रेसला देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी सहनच होत नाहीत – संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी
अविनाश मठाच्या महंतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या खोचक ट्वीटमधून नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर टीका करण्यात आली आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1662729567650422784
नव्या संसद भवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे – नरेंद्र मोदी
पंचायत भवन ते संसद भवन, या प्रत्येक ठिकाणी आपली प्रेरणा ही देशाच्या आणि नागरिकांच्या विकासाची आहे – नरेंद्र मोदी
या संसदेत जे लोकप्रतिनिधी बसतील, ते नव्या प्रेरणेनं लोकशाहीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला देश सर्वात आधी, या भावनेनं पुढे वाटचाल करावी लागेल. आपल्याला कर्तव्यपथाला सर्वोच्च स्थान द्यावं लागेल. आपल्याला आपल्या कामगिरीतून उदाहरण सादर करावं लागेल. आपल्याला सातत्याने स्वत:मध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला नवे रस्ते स्वत:लाच बनवावे लागतील. स्वत:ची झीज करावी लागेल. लोककल्याणालाच आयुष्याचा मंत्र बनवावा लागेल. जेव्हा संसदेत आपण आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू, तेव्हा देशवासीयांनाही नवी प्रेरणा मिळेल – नरेंद्र मोदी
यशस्वी होण्याची पहिली अट यशस्वी होण्याचा विश्वास हीच असते – नरेंद्र मोदी
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून मी सांगितलं होतं.. यही समय है, सही समय है. प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते की जेव्हा देशाची चेतना नव्याने जागृत होत असते. स्वातंत्र्याच्या २५ वर्षं आधी अशीच वेळ आली होती. गांधीजींच्या असहकार आंदोलनाने संपूर्ण देशाला भारून टाकलं होतं. प्रत्येक भारतीयाला जोडलं होतं. या सगळ्याचा परिणाम आपण १९४७ साली स्वातंत्र्यामध्ये पाहिला. स्वातंत्र्याचा अमृतकाळही भारताच्या इतिहासातला असाच टप्पा आहे – नरेंद्र मोदी
संसदेच्या जुन्या भवनात सगळ्यांसाठी आपली कामं पूर्ण करणं फार कठीण होतं. तंत्रज्ञान, बसण्याच्या जागा यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही चर्चा सातत्याने होत होती की देशाला नव्या संसद भवनाची गरज आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये खासदारांची संख्या वाढली असती. मग ते कुठे बसले असते? त्यामुळेच ही काळाची गरज होती की संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम केलं जावं. मला आनंद आहे की ही नवी इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या वेळेलाही या सभागृहात सूर्याचा प्रकाश थेट येत आहे. वीजेचा अत्यल्प वापर व्हावा याचीही काळजी घेण्यात आली आहे – नरेंद्र मोदी
लोकसभेची अंतर्गत रचना राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित आहे. राज्यसभेची अंतर्गत रचना राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे. संसदेच्या अंगणात राष्ट्रीय फळाचंही झाड आहे. या संसदेत राजस्थानहून आणलेले ग्रेनाईट्स आणले आहेत. लाकूड महाराष्ट्रातून आलंय. उत्तर प्रदेशच्या कारागीरांनी आपल्या हातांनी कारपेटवर नक्षीकाम केलंय. यातून एक भारत, श्रेष्ठ भारतचं खऱ्या अर्थाने दर्शन होतंय – नरेंद्र मोदी
नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन होत असताना कुस्तीगीरांनी तिथेच महापंचायत भरवण्याचा निश्चय केला होता. पंरतु, त्यांचा हा निश्चय पोलिसांनी हाणून पाडला असून नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या काही कुस्तीगीरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे जंतर मंतर ते नव्या संसद भवनाच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं.
“अमृतकाळाचं आवाहन आहे..
मुक्त मातृभूमीको नवीन प्राण चाहिये
नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये
मुक्त गीत हो रहा, नवीन राग चाहिये
नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये
इसीलिये इस कार्यस्थली को भी उतनाही नवीन होना चाहिये”
जो थांबतो, त्याचं भाग्यही थांबतं. जो चालत राहातो, त्याचंच भाग्य पुढे सरकत राहातं, यशाच्या शिखरावर जातं. त्यासाठी चालत राहा. गुलामीच्या नंतर भारतानं खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरू केला होता. ती यात्रा कितीतरी चढ-उतारांनंतर, अडचणी पार करत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करती झाली आहे – नरेंद्र मोदी
मला वाटतं की हे आपलं भाग्य आहे की या पवित्र सेंगोलला आपण त्याचं वैभव, मान पुन्हा परत देऊ शकलो आहोत. जेव्हा या संसदेत कार्यवाही सुरू होईल, तेव्हा हे सेंगॉल आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहील – नरेंद्र मोदी
संसदेच्या नव्या इमारतीत पवित्र सेंगोलचीही स्थापना झालीये. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथ, राष्ट्रपथचं प्रतीक मानलं जात होतं. राजाजी आणि आदिनमच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हेच सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक बनलं होतं. तमिळनाडूहून आलेले आदिनमचे संत संसद भवनात आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. त्यांच्याच मार्गदर्शनात लोकसभेत हे संगोल स्थापित झालं आहे – नरेंद्र मोदी
आज पुन्हा एकदा अवघं जग भारताला, भारताच्या संकल्पाच्या दृढतेला, भारतीयांच्या प्रखरतेला आदर आणि अपेक्षेने पाहात आहे. जेव्हा भारताचा विकास होतो, तेव्हा जगाचा विकास होतो. संसदेचं हे नवीन भवन भारताच्या विकासापासून जगाच्या विकासाचंही आवाहन करेल – नरेंद्र मोदी
प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण हे अमर होऊन जातात. आज भारतासाठी २८ मे हा असाच एक दिवस आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ७५ रुपयांच्या नाण्याचं लोकार्पण करण्यात आलं.
मी सर्व देशवासीयांना या सुवर्ण क्षणांच्या शुभेच्छा देतो – नरेंद्र मोदी
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींचं खोचक ट्वीट; म्हणाले, “संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नव्या संसदेच्या लोकसभेत आगमन होताच उपस्थित खासदारांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नव्या संसद भवनातील पहिल्या कार्यक्रमाला राष्ट्रगीताने सुरुवात झाली.
नव्या लोकसभेत सर्व सत्ताधारी खासदार स्थानापन्न झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं आहे.
आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय – शरद पवार
राष्ट्रीय जनता दलाच्या ट्वीटवरून वाद निर्माण होण्याची शक्यता. संसदेच्या नव्या इमारतीचं तुलना केली थेट मृतदेह पुरण्याच्या शवपेटीशी!
राजदबद्दल काय बोलू मी? त्यांची तर काही भूमिकाच नाहीये. जुन्या इमारतीला तर दिल्ली अग्निशमन दलाचा क्लीअरन्सही नव्हता. कधीकाळी मुलायमसिंह यादव जेव्हा तिथे त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात बसून जेवण करत होते, तेव्हा सीलिंगचा एक भाग खाली पडला होता. मोठा वाद झाला होता. राजद त्याला ताबूत का म्हणतंय? दुसरं कोणतं उदाहरणही देऊ शकले असते. त्यातही हे धार्मिक रंग आणतात – असदुद्दीन ओवैसी
कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं. या देशाचं नाव जगभरात मोदींनी उज्ज्वल केलं आहे. त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं होतं – एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचे आज नवी दिल्लीत उद्घाटन पार पडले. मात्र, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेसह अन्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण सोडले आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आक्षेप घेतला जातोय हे दुर्दैव आहे. घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांना देशाचं कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद, सावरकरांचं वावडं आहे असं आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. काही लोकांनी अशा मंगलमयी समारंभात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पण सगळा देश पाहातोय. देशातली सगळी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संसदेच्या उद्घाटनासाठी कुणी आमंत्रणाची वाट पाहाणं हे लोकशाहीला धरून नाही. उद्घाटनाला विरोध करणं हा राजकीय डावपेच खेळला गेला – दीपक केसरकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली त्यावेळची काही क्षणचित्रे!
उद्घाटन सोहळ्याला विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देऊन उत्तर देईल, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यावर अजित पवारांनी टीका करताना “हे जमालगोटा वगैरे शब्द मुख्यमंत्र्यांना तरी पटतात का?” असा सवाल केला आहे.
संसद भवन देशासाठी आणि लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. आम्ही सगळ्यांनीच उद्घाटन सोहळा साजरा करण्यासाठी देशासाठी एकत्र आलो असतो तर ते जास्त योग्य झालं असतं. संसदेची सगळी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते. जेव्हा विधेयक मंजूर करायचं असतं, तेव्हा मंत्री मोठ्या नेत्यांना फोन करतात. तसंच जर या सरकारमधल्या वरीष्ठ नेत्यांनी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता, तरी सगळे खुशीने गेले असते. संविधानाने देश चालतो. ही लोकशाही असेल तर त्यात विरोधी पक्ष असलाच पाहिजे. आंबेडकरांचा तसा आग्रह होता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज विरोधी पक्ष नसेल, तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे – सुप्रिया सुळे
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनीही ट्वीट करून नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरही मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा ११ च्या सुमारास सुरू होणार. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.
नव्या संसद भवनाला तीन दरवाजे आहेत. त्या तीन दरवाज्यांना अनुक्रमे ज्ञानद्वार, कर्मद्वार आणि शक्तीद्वार अशी नावं आहेत.
राजधानी दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था!
अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
शाहरूख खाननं नव्या संसद भवनाबाबत ट्वीट केल्यानंतर त्यावर खुद्द मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने नव्या संसद भवनाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन संसद भवन उद्घाटन / सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Prime Minister Narendra Modi will Inaugurate New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन!