जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. एकाबाजूला पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात असताना आता पाकने काही अटींवर द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली आहे. भारताबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत.

द्विपक्षीय स्तरावर भारताबरोबर चर्चा करण्याच्या प्रस्तावाचा आम्ही कधीही विरोध केलेला नाही. शाह महमूद कुरेशी यांचे विधान हा पाकिस्तानच्या भूमिकेत झालेला बदल आहे. कारण मागच्याच आठवडयात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हटले होते.

आम्ही चर्चेला कधीच नकार दिलेला नाही पण भारताने चर्चा करण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली नाही असे कुरेशी म्हणाले. काश्मीर प्रश्नावर भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी दुसऱ्या देशाने हस्तक्षेप करावा यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. त्यावर दुसऱ्या देशाने हस्तक्षेप केला तर ती खरोखर चांगली बाब असेल असे कुरेशी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल्या राजकीय नेत्यांची सुटका केल्यानंतर चर्चेची प्रक्रिया सुरु करता येईल असे कुरेशी म्हणाले. काश्मीर मुद्दांमध्ये भारत, पाकिस्तान आणि काश्मिरची जनता हे तीन पक्ष असल्याचे शाह महमूद कुरेशी यांचे म्हणणे आहे. आता जम्मू-काश्मीरवर नाही तर पाकव्याप्त काश्मीरवर यापुढची चर्चा होईल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.