काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटणार आहेत. जमिनीच्या वादातून उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये मंगळवारी १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. बुधवारी ही घटना घडली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, घोरवाल येथील सापही गावात ही घटना घडली असून जमिनीच्या वादातून दोन गटातमध्ये हाणामारी सुरु झाली यावेळी काही जणांनी गोळीबारही केला. त्यानंतर पळापळ सुरु झाली यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि ६ परुषांचा समावेश आहे.

भाजपाच्या राज्यात गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. खुलेआम हत्या करण्यात येत आहेत. सोनभद्रच्या उम्भा गावात भू माफियांनी १० जणांना ठार केलं. आदिवासी बांधवांची हत्या करण्यात आली. ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.