विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा ही फसवी निघाली. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. सुजय यांच्या प्रचारासाठी विखे यांनी भाजपा-सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बठकीस हजेरी लावल्याने ही चर्चा सुरु झाली होती. मात्र विखे यांनी सर्वानाच चकवा दिला.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नगर येथील सभेत विरोधी पक्षनेते विखे हे प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. विखे यांनी या संबंधी कुठलीही भूमिका व्यक्त केली नव्हती. मात्र सुजय यांच्या प्रचाराच्या नियोजनात ते सेना भाजपाच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. पालकमंत्री राम शिंदे यांनी विखे यांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र विखे हे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत, तसेच त्यांच्या स्वागतालाही त्यांनी हजेरी लावली नाही. पंतप्रधान मोदी यांचे शिर्डी येथे विमानतळावर आगमन झाले. तेव्हा त्यांचे विखे हे स्वागत करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र ते शिर्डी येथील विमानतळावर तसेच नगरच्या हेलिपॅडवर मोदी यांच्या स्वागताला गेले नाहीत. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोलीस परेड ग्राऊंडवर स्वागत केले नाही. व्यासपीठावर कट्टर विखे समर्थक व काँग्रेसचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी मात्र हजेरी लावली. आज विखे हे कार्यकर्त्यांपासूनही दूर होते. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी राज्यभरातील राजकीय नेते व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. विखे यांनी नेहमीप्रमाणे चकवा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी सभेत सुजय विखे यांनी,राधाकृष्ण विखे पाटील हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यांचे राष्ट्रवादीशी मतभेद आहेत. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणार नाहीत, असा खुलासा केला. त्यामुळे तूर्तास विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा थांबणार आहेत.