एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : राज्यघटनेची प्रास्ताविका बदलण्यायोग्य नाही, परंतु आणीबाणीच्या काळात ती बदलण्यात आली. ही कृती घटनाकारांच्या सुज्ञपणावर विश्वासघात दर्शविते. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत ‘समाजवाद’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ हे शब्द जोडून सनातनच्या भावनेचा अपमान करण्यात आला, अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धडखड यांनी शनिवारी केली.

दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, प्रास्ताविका ही कोणत्याही संविधानाचा आत्मा आहे आणि भारताशिवाय इतर कोणत्याही देशाने ती बदलली नाही. प्रास्ताविका हे राज्यघटनेचे बीज आहे, त्याच्या आधारावर संविधान वाढले आहे. मात्र भारतीय राज्यघटनेची ही प्रास्ताविका १९७६च्या ४२ व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे बदलण्यात आली, ज्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा देशाच्या राज्यघटनेसाठी सर्वात काळा काळ होता. प्रास्ताविका ही राज्यघटनेची आत्मा असतानाही नवे शब्द जोडून राज्यघटनेचा आत्मा बदलण्यात आला, अशी टीका धनखड यांनी केली. नव्याने जोडण्यात आलेले शब्द चिघळणारी जखम आहे आणि सनातनच्या भावनेचा अपमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द प्रास्ताविकेत राहावेत की नाही यावर चर्चा झाली पाहिजे असे म्हटल्यानंतर दोन दिवसांनी उपराष्ट्रपतींनी आपले मत मांडले. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनीही शुक्रवारी होसबाळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचा काँग्रेसवर आरोप

  • राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द जोडण्याबाबत संघाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत भाजपनेही शनिवारी काँग्रेसवर टीका केली.
  • राज्यघटनेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विधानांचा आणि त्यात बदल करण्याच्या त्यांच्या दाव्याचा उल्लेख भाजपने केला.
  • भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्या काळातील माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देऊन इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत आणि भाषणातून संविधानावर टीकात्मक भूमिका मांडली होती, अशी टीका केली.

राज्यघटनेची प्रास्ताविका बदलता येत नसतानाही ती बदलण्यात आली. हा राज्यघटनेच्या आत्म्याचा अवमान आणि घटनाकारांच्या दृष्टिकोनाचा विश्वासघात आहे. – जगदीप धनखड, उपराष्ट्रपती.