Shashi Tharoor cryptic post after Mallikarjun Kharge Comment : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी केलेल्या मोदींच्या स्तुतीमुळे काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. यावरून काही काँग्रेस नेत्यांनी थरूर यांच्यावर उघडपणे टीका देखील केली आहे. यातच आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील थरूर यांच्याबद्दल एक भाष्य केले आहे. शशी थरूर यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत, असे खरगे म्हणाले.

थरूर यांनी काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रासाठी लेख लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते. याहज्जस दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांना प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, “मला इंग्रजी भाषा फार कळत नाही. त्यांची (थरूर) इंग्रजी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळचे त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्यपद देण्यात आलेले आहे.”

तर पुढे बोलताना खरगे म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर झाले त्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष आणि आम्ही भारतीय लष्कराच्या आणि सैनिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत होतो. आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत. तर आम्ही त्यात काय करणार?”, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी थरूर यांना लगावला.

थरूर काय म्हणाले आहेत?

खरगे यांच्या या विधानानंतर थरूर यांची एक क्रिप्टिक पोस्ट समोर आळी आहे, ज्यामध्ये त्यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लिहिलेले आहे की, “उडण्यासाठी परवानगी मागत बसू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचेही नसते.”

ऑपरेशन सिंदूर नंतर शशी थरूर यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक देशांमध्ये जे प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात आले होते, त्यापैकी एकामध्ये थरूर यांचा देखील सहभाग होता. त्यांनी अनेकवेळा सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याचे पाहायला मिळाले, याबरोबरच त्यांनी अनेकदा पाकिस्तानला देखील उघडे पाडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती देखील केली.