Shubhanshu Shukla Emotional Note for Wife Kamna Before Axiom Mission 4 Launch : भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) दुपारी १२ वाजून एक मिनिटाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं आहे. नासाचं फॉल्कन-९ हे यान घेऊन ते अवकाशात झेपावलं. त्यांच्याबरोबर या मोहिमेत आणखी तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, ‘ॲक्सिऑम-४’ मिशनअंतर्गत रॉकेटच्या उड्डाणाआधी शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या पत्नीसाठी व जवळच्या लोकांसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आज (२५ जून) सकाळी आम्ही ॲक्सिऑम-४ मोहीमेसाठी या ग्रहावरून (पृथ्वी) निघण्याची योजना आखत असताना या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे आशीर्वाद व प्रेमाबद्दल मी आभार मानू इच्छितो”.

शुभांशू शुक्ला यांनी म्हटलंय की “या प्रवासादरम्यान माझ्यासाठी माझे आधारस्तंभ असलेलं माझं कुटुंब व मित्रांचे देखील खूप खूप आभार. कधीकधी तुमचे जवळचे लोक तुमच्यासाठी असे काही त्याग करतात की आपल्याला त्याची कल्पनाही नसते, किंवा आपल्याला ते त्याग समजतही नाहीत. मात्र, ते आपल्यावरील प्रेमापोटी सगळं करत असतात.

पत्नीसाठी खास शब्द

“आयुष्याच्या प्रवासातील माझी अद्भूत भागीदार असलेल्या कामना शुक्लाचे विशेष आभार. तुझ्याशिवाय हे काहीच शक्य नव्हतं आणि तू नसतीस तर या कशालाच किंमत नसती. आमच्यापैकी कोणीही एकट्याने अंतराळात प्रवास करत नाहीये. अनेकांच्या भरवशावर आम्ही हे करू शकतो. मी तुमच्या प्रत्येकाचा आभारी आहे. धन्यवाद”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभांशू शुक्लांची अंतराळ मोहीम

‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी आज अवकाशात उड्डाण केलं. नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केलं. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. १ वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.