दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपनंतर या घटनेचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिव बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात स्वाती मालीवाल यांनी मोठं भाष्य केलं आहे.

खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या घटनेच्यासंदर्भात पहिल्यांदा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तसेच गुन्हा दाखल केला तर मला भारतीय जनता पार्टीचा एजंट म्हणून आरोप केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, मी माझ्या करिअरचं काय होईल, याचा विचार केला नाही आणि गुन्हा दाखल केला, अशी प्रतिक्रिया देत स्वाती मालीवाल या भावूक झाल्या. त्या एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

हेही वाचा : माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना पत्राद्वारे इशारा; म्हणाले, “जिथे कुठे असशील परत ये, अन्यथा…”

स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?

“मी १३ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉईंग रूममध्ये बसवलं. त्यावेळी बिभव कुमार यांनी मला मारहाण केली. सात-आठ थप्पड मारल्या. त्यावेळी मी खूप जोरात ओरडले. मात्र, तरीही माझ्या मदतीला कोणीही आलं नाही”, असं स्वाती मालीवाल यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, “ही घटना घडल्यानंतर मला सांगण्यात आलं होतं की, जर गुन्हा दाखल केला तर संपूर्ण आम आदमी पार्टी तुम्हाला एकट पाडेल. संपूर्ण पार्टी तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा एजेंट म्हणून संबोधेल. मला सांगितलं होतं की तुमच्या बरोबर कोणीही उभं राहणार नाही. तरीही मी कशाचाही विचार केला नाही. माझं काय होईल? माझ्या करीअरचं काय होईल? हे लोकं माझ्याबरोबर काय करतील? मी फक्त याचा विचार केला की, मी नेहमी सर्व महिलांना सांगायचे की,नेहमी सत्याच्या बाजूने राहा. कोणाबरोबर अन्याय झाला असेल तर खरी तक्रार करा. अन्यायाविरोधात लढा. त्यामुळे आज मी देखील लढत आहे”, असं म्हणत स्वाती मालीवाल काहीशा भावूक झाल्या.

अरविंद केजरीवालांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीच्या आरोपावर पहिल्यांदा भाष्य केलं. ते म्हणाले की, “मला या प्रकरणात निष्पक्ष तपास आणि न्याय हवा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही टिप्पणी केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी आशा आहे”, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.