Elon Musk Tesla Share : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामधून उद्योगपती इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, त्यामुळे दोघांमधील मतभेद समोर आले असून अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. यातच आता इलॉन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बोलणं चांगलंच महागात पडलं आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून इलॉन मस्क यांचं १५२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. टेस्लाचे शेअर्स गुरुवारी तब्बल १४ टक्के घसरले असून बाजारमूल्यात १२.६ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे इलॉन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आधी मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात बोलणं महागात पडलं आहे. तसेच मस्क यांना ट्रम्प यांच्या वादाचा परिणाम मस्क यांच्या टेस्ला कंपनीवर होत असल्याचं दिसून येत आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये गुरुवारी १४ टक्के घसरण झाल्याने त्याचं बाजारमूल्य १५२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान मानलं जात आहे. तसेच गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपैकी चार सत्रांमध्ये या शेअरमध्ये घसरण झाली आहे. दरम्यान, टेस्लाच्या शेअर्समध्ये मे महिन्यात २२ वाढ झाली होती. मात्र, मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वादानंतर या आठवड्यात टेस्लाच्या शेअर्समध्ये जवळपास १८ टक्क्यांची घट झाली. तसेच या वर्षी आतापर्यंत टेस्लाचे शेअर्स जवळपास ३० टक्के घसरले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इलॉन मस्क यांचं ट्रम्प यांच्याबाबत मोठं विधान
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना इलॉन मस्क यांनी एक मोठं विधान केलं आहे. इलॉन मस्क यांनी म्हटलं की, “माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळालं असतं. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये फक्त ५१ किंवा ४९ मतांनी आघाडी मिळाली असती”, असं मस्क यांनी म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्याबाबत काय म्हटलं?
इलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रितिक्रया देताना म्हटलं की, “इलॉन मस्क आणि माझे पूर्वी चांगले संबंध होते. पण आता मला माहित नाही की आम्ही एकत्र राहू शकू की नाही? इलेक्ट्रिक-वाहनांवरील कर याबाबतच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीनंतर टेस्ला प्रमुख निराश झाले असावेत. मी देखील मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे. मी त्यांना खूप मदत केली”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.