Krishna temple in Utah : अमेरिकेतील यूटामधील एका हिंदू मंदिरावर तीन वेळा गोळ्या झाडत हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यूटामधील एका राधा-कृष्ण मंदिरावर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे हिंदू समुदायात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर अमेरिकेतील हिंदूंच्या संघटनेने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार जूनमध्ये तब्बल तीन वेळा घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राधा कृष्ण मंदिरावराच्या घुमटावर आणि पूजागृहाच्या खिडकीसह मंदिराच्या प्रमुख भागांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आता पोलीस अधिकारी तपास करत आहेत. यूटाच्या स्पॅनिश फोर्कमध्ये असलेल्या या राधा कृष्ण मंदिरावर एकूण २० ते ३० गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेला हल्ला त्या महिन्यातील मंदिरावरील तिसरा हल्ला होता. हा हल्ला द्वेषपूर्ण असल्याचा संशय इस्कॉन मंदिर प्रशासनाने केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इंस्टाग्रामवर गोळीबाराच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, आठवड्याच्या शेवटी यूटामधील कृष्ण मंदिराच्या तोडफोडीच्या घटनांची माहिती मिळाली आहे. यूसीएसओच्या प्रतिनिधींनी मंदिरावरील हल्ल्याच्या घटनेनंतर विविध पुरावे जप्त केले असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भात मंदिराचे अध्यक्ष वाई वॉर्डन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “हे हल्ले द्वेषाचे परिणाम असू शकतात. आम्हाला वाटतं की हे द्वेषावर आधारित हल्ले आहेत.”
दरम्यान, हे राधा कृष्ण मंदिर दोन दशके जुने असून स्पॅनिश फोर्कमधील एका टेकडीच्या माथ्यावर आहे. मंदिराच्या सह-संस्थापक वैभवी देवी यांनी सांगितलं की, “गेल्या काही दिवसांत मंदिराच्या इमारतीवर आणि आजूबाजूच्या मालमत्तेवर २०-३० गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी काही भाविक आणि पाहुणे आत उपस्थित असताना अशा प्रकारचा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत मंदिराच्या कमानींसह हजारो डॉलर्सचे संरचनात्मक नुकसान झालं आहे.”