उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये राज्य सरकारला यश आल्याचं सांगताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची तुलना थेट अमेरिका आणि युरोपशी केलीय. राज्यातील करोना परिस्थिती हाताळताना राज्य सरकार २०२० पासूनच चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं योगींनी लखनऊमधील एका कार्यक्रमात म्हटलं. राज्यातील दर १० लाख लोकसंख्येमागे करोना मृतांचा आकडा ४७ इतका असल्याचं योगींनी सांगितलं. इतकच नाही राज्य सरकारची कामगिरी किती चांगली आहे हे सांगताना या मृत्यूदराची तुलना योगींनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रासोबत केली. अमेरिका आणि युरोपमधील प्रगत राष्ट्रांमध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा असूनही तेथे दर १० लाखांमागे १८०० ते २१०० जणांचा मृत्यू झाल्याचं योगींनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारच्या कायदा विषयक विभागाने प्रकाशित केलेल्या करोनासंदर्भातील पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ बोल होते. बेजबाबदार पद्धतीने कारभार केल्यामुळे इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये करोना मृतांचा आकडा जास्त असल्याचं योगींनी म्हटलं. या उलट उत्तर प्रदेशमध्ये करोनासंदर्भातील नियोजन, चाचण्या आणि उपचारांवर जोर देण्यात आल्याचंही योगींनी सांगितलं.

“भारताशी तुलना केल्यास अमेरिका आणि युरोपमध्ये खूप चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत. मात्र या देशांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि तेथील मृत्यूचा दर हा खूप जास्त आहे. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे आणि तिथे सहा लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. तर भारतामध्ये १३५ कोटी लोकसंख्या असताना तीन लाख २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एखाद्याचा मृत्यू होणं सुद्धा वाईट गोष्ट आहे. जीव वाचवण्याचा प्रत्येक स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे. असं असलं तरी कमकुवत आरोग्य व्यवस्था असतानाही भारताने इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी केलीय,” असं योगी म्हणाले.

आणखी वाचा- भारतात दैनंदिन रुग्णसंख्या घटली; २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ रुग्ण; मृतांची संख्या मात्र चिंताजनक

करोनाच्या दोन्ही लाटांच्या वेळेस उत्तर प्रदेशासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळेस आम्ही ही चिंता चुकीची असल्याचं कामगिरीतून सिद्ध केल्याचं योगी म्हणाले. पहिल्या लाटेच्या वेळेस लॉकडाउन लागेल आणि तो दोन महिने सुरु राहील असं वाटलं नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. लॉकडाउनला लागण्यापूर्वीच सरकारने करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं योगींनी सांगितलं. “२२ मार्च २०२० रोजी लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा फोन आला. त्यांनी आपल्याला उत्तर प्रदेशची चिंता वाटत असल्याचं सांगितलं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मला शक्य आहे ते सर्व मी करेन असा शब्द मी त्यांना दिला. पहिल्या लाटेच्या वेळेस करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात यशस्वी राज्य ठरलं होतं,” असं योगी म्हणाले.

करोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचं योगींनी सांगितलं. पहिल्या काही दिवसांमध्ये उपचार सुरु केले नाही तर रुग्णांची प्रकृती चिंताजन होण्याची आणि करोनानंतरही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता या लाटेत अधिक होती. सरकारने १४ तज्ज्ञांचा समावेश असणारी सल्लागार समिती नेमली होती. या समितीच्या सल्ल्यानुसार सरकार काम करत असल्याचं योगींनी म्हटलं आहे. ग्रामीण भागात करोना पसरणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं योगींनी म्हटलं.

करोनासंदर्भात लोकांमध्ये जागृती करण्याची गरज योगींनी बोलून दाखवली. अनेक प्रकरणांमध्ये लोकांकडे योग्य माहिती नसल्याचं दिसून आलं. खास करुन ग्रामीण भागात हा प्रकार अधिक होता. अनेक ठिकाणी लोकांनी करोनाला देवी समजलं आणि ते त्याची पुजा करु लागल्याचंही योगी म्हणाले. “या त्यांच्या भावना झाल्या. मात्र त्याचवेळी यामुळे त्यांच्याकडे योग्य माहिती पोहचली नसल्याचं स्पष्ट झालं. करोनासारख्या आजारात काळजी घेणं हे इलाजापेक्षा उत्तम आहे. मात्र तरीही काही जण आजारी पडले तर त्यांना वेळेत उपचार मिळायला हवेत,” असं योगी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh covid death rate lower than us and europe says cm yogi adityanath scsg
First published on: 02-06-2021 at 17:00 IST