पाकिस्तानातील वझिरीस्तानमधल्या एका जिल्ह्यात वास्तव्य करणारा १९ महिन्यांचा मुलगा अहमद याला पोलिओ झाला आहे. २०२५ मध्ये समोर आलेलं पाकिस्तानातल्या पोलिओचं हे १४ वं प्रकरण आहे. इस्लामाबादच्या आरोग्य संस्थेने १ जुलै रोजी ही माहिती दिली. खैबर पख्तूनवा प्रांतातील पोलिओ झालेल्या मुलांची संख्या आठवर गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खरंतर १४ जणांना पोलिओ होणं ही संख्या खूप मोठी आहे असं नाही. मात्र यामागे दडली आहे एक नकोशी आठवण. तसंच जगातल्या दोन देशांपैकी पाकिस्तान हा असा देश आहे जिथे पोलिओ अजूनही अस्तित्वात आहे.
मुस्तफा कमाल यांनी काय सांगितलं?
जगभरातल्या देशांप्रमाणेच पाकिस्ताननेही पोलिओ विरोधात आरोग्य मोहीम सुरु केली. पाकिस्तानचे आरोग्य मंत्री सय्यद मुस्तफा कमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पोलिओचं ९९ टक्क्यांपर्यंत निर्मूलन झालं आहे. लसीकरण मोहिमेमुळे आणि ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आम्ही ही मजल मारु शकलो असंही त्यांनी म्हटलं आहे. आमचा हा लढा फक्त पोलिओ निर्मूलनाचा नाही पण साधारण दहा वर्षांपूर्वी सीआयएने राबवलेल्या एका मोहिमेमुळे काय घडलं होतं ही नकोशी आठवणही त्यांनी सांगितली आहे.
२०११ मध्ये काय घडलं होतं?
सीआयएने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लपलेल्या ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी एक बनावट लसीकरण मोहीम राबवली होती. सीआयएने उचललेलं असं पाऊल होतं जे कुणालाही अपेक्षित नव्हतं. या बनावट मोहिमेचा फटका पाकिस्तानच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेला कैक वर्षांपर्यंत बसला. ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यासाठी सीआयएने शकील आफ्रिदी या डॉक्टरची गुप्त मदत घेतली होती. लसीकरण मोहिमेच्या आडून ओसामा बिन लादेनचा डीएनए शोधण्याचं जोखमीचं काम डॉ. शकील अफ्रिदीला देण्यात आलं होतं. लसीकरणासाठी जायचं आणि त्या बहाण्याने डीएनए मिळावा म्हणून लाळ आणि रक्ताचे नमुने गोळा करायचे. ओसामा बिन लादेनच्या मेलेल्या बहिणीच्या डिएनएशी तो जुळतो आहे का? हे सीआयएला पाहायचं होतं त्यामुळे ही बनावट लसीकरण मोहीम राबवण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे. ज्यात अमेरिकेला यश आलं आणि ओसामा बिन लादेन मारला गेला. पण या मोहिमेची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली.
पाकिस्तानात बनावट लसीकरण मोहिमेची बातमी पसरल्यावर काय घडलं?
पाकिस्तानात बनावट लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याची माहिती जशी लोकांमध्ये पसरली तसा त्याचा फटका पोलिओच्या खऱ्या लसीकरण मोहिमेलाही बसला. कारण या मोहिमेकडेही लोक बनावट म्हणून पाहू लागले. पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेला खिळ लावण्यासाठी ही बनावट मोहीम पुढे काही वर्षे कारणीभूत ठरली. त्यामुळे जगातून पोलिओचं उच्चाटन झालं तरीही पाकिस्तानात पोलिओचा अंतर्भाव आहे. पोलिओ निर्मूलनाचं काम करणाऱ्या वैद्यकीय अनेक कर्मचाऱ्यांना कट्टरपंथीयांनी गेल्या काही वर्षांमध्ये लक्ष्य केलं. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तातच ही मोहीम राबवावी लागते आहे. नोव्हेंबर महिन्यात एक स्फोट झाला होता त्यात नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर खैबर पख्तुनवा मध्ये २० आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा गार्ड यांची अशाच प्रकारच्या हल्ल्यांमध्ये हत्या करण्यात आली. लसीकरण मोहीम पूर्ण न झाल्याने आता लाखो मुलांच्या आरोग्यावर पोलिओ नावाची टांगती तलवार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात वाढला हिंसाचार
आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात हिंसाचार वाढल्याने या मोहिमेवरचा अविश्वासच फोफावत गेला. डॉन च्या बातमीनुसार खैबर पख्तुनवा या ठिकाणी १९ हजार ७० जणांनी पोलिओच्या लसीकरणालाच नकार दिला. साधारण १ लाख मुलांना लसीकरण करण्यात आलेलं नाही. आमची मुलं घरात नाहीत असं सांगून त्यांच्या आई वडिलांनीच त्यांना लसीकरणापासून चार हात लांब ठेवलं. २०१४ मध्ये सीआयएने पाकिस्तानला वचन दिलं की पुन्हा अशा प्रकारची कुठलीही बनावट मोहीम दहशतवाद्याला शोधण्यासाठी राबवली जाणार नाही. पण तोपर्यंत लोकांचा लसीकरणावरुन विश्वास उडाला होता. खरी मोहीमही त्यांना बनावटच वाटू लागली. त्यामुळे पोलिओच्या मोहिमांवर या घटनेचं सावट राहिलं ते अजूनही कायम आहे असंच दिसून येतं आहे.