Karnataka Congress Government : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कर्नाटक काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू असल्याचं बोललं जातं. मात्र, या संघर्षाच्या चर्चांनंतर काँग्रेस हायकमांडने याची दखल घेत अखेर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला कर्नाटक दौऱ्यावर आल्याची चर्चा आहे.
काँग्रेस हायकमांडने रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकला पाठवलं असून ते काँग्रेस आमदारांचा आढावा घेण्यासाठी आल्याची चर्चा आहे. दरम्यान, कर्नाटकला नवे मुख्यमंत्री मिळणार का? सरकारमध्ये फूट पडलीये का? किंवा सरकारमध्ये काही फेरबदल होणार आहेत का? असे सवाल उपस्थित करण्यात आले येत आहेत. पण या सर्व प्रश्नांवर आता काँग्रेसने खुलासा करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच सिद्धरामय्या हे
रणदीप सुरजेवाला यांनी या चर्चांवर पत्रकार परिषद घेत अशा प्रकारचं काही घडणार नसल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच आपला कर्नाटक दौरा हा फक्त संघटनात्मक आढाव्याचा एक भाग असून संभाव्य नेतृत्व बदल किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाची अशी कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
अशातच कर्नाटक काँग्रेस नेत्यांच्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी म्हटलं की, “उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी जवळपास १०० आमदारांची आहे. हे फक्त नेतृत्व बदलाबाबत नाही, तर बहुतेक आमदारांना प्रभावी प्रशासन हवं आहे”, असं इक्बाल हुसेन यांनी म्हटलं आहे.
तसेच काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि अनेक आंदोलनांचं नेतृत्व करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळण्यासाठी ते पात्र असल्याचं मत देखील हुसेन यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, या चर्चांना सुरजेवाला यांनी पूर्णविराम दिला आणि म्हटलं की, “जर कोणत्याही आमदारांचे काही प्रश्न असतील तर ते पक्षात आणि सरकारमध्ये सोडवले पाहिजेत.”