scorecardresearch

उंच इमारतींमध्ये राहता? भूकंप आल्यावर चुकूनही वापरू नका लिफ्ट; अशाप्रकारे वाचवता येईल स्वतःचा जीव

भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भभवल्यास या गोष्टी लक्षात ठेवा.

safety tips during earthquake
काल रात्री उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. (Photo : Twitter)

काल रात्री दिल्ली एनसीआरसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंप ही अचानक येणारी आपत्ती आहे त्यामुळे तो कधी आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ऐनवेळी अशा धोकादायक घटनेपासून बचाव करण्यासाठी ठोस अशी उपाययोजना नाही. परंतु असे भूकंप आल्यावर स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही सूचनाचं पालन आणि खबरदारी घेतल्यास आपण भूकंपासून स्वतःचे संरक्षण करु शकतो. तर यासाठी काय करावं लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भूकंप येण्यापुर्वी काय करावे?

सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर खूप जुने असेल तर घरातील संभाव्य धोका ओळखा आणि ज्या वस्तू कमकुवत झाल्या आहेत त्या व्यवस्थित करुन घ्या. तिजोरी किंवा कपाटाचे कुलूप नीट लावा. विशेषत: घरगुती उपकरणांमध्ये गॅस कनेक्शन बंद ठेवा. याशिवाय घरातील पंखा किंवा झुंबर इत्यादी, भूकंप आल्यावर पडणार नाही याची काळजी घ्या.

हेही पाहा- तुमचा एसी किती ‘टन’चा आहे? एअर कंडिशनर खरेदी करताना ही माहिती असणे फायदेशीर ठरते का?

आपत्कालीन किट तयार करा –

आपत्कालीन किट नेहमी तयार ठेवा, ते किमान ७२ तासांसाठी पुरेल एवढे असावे. या किटमध्ये पाणी, खाद्यपदार्तांसह इतर महत्त्वाच्या गोष्टी ठेवा, हे किट तयार करताना तुमच्या पाळीव प्राण्यांसह तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करा.

जमीनीला हादरे बसतात तेव्हा काय करायचे –

भूकंपाचे धक्के जाणवायला लागल्यावर तुम्ही घरामध्ये असाल तर बाहेर पडण्याची घाई करू नका किंवा इतर खोल्यांमध्ये पळण्याचा प्रयत्न करू नका. कारण, हादऱ्यांमुळे तुम्ही पडू शकता किंवा एखादी वस्तू तुमच्या अंगावर पडू शकते. अशा परिस्थितील गृह मंत्रालयाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग (NDMD) तीन गोष्टी करण्याचा सल्ला देतो. त्या म्हणजे ड्रॉप, कव्हर, आणि होल्ड ज्याला भूकंप काळातील जीवनाचा त्रिकोण असंही म्हटलं जातं. तर हे तीन उपाय काय आहेत जाणून घेऊया.

हेही वाचा- जिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, मग मृतदेह पाण्यावर का तरंगतो? जाणून या मागचं वैज्ञानिक कारण

  • ड्रॉप –

स्वतःला वाचवण्यासाठी टेबल किंवा इतर वस्तूखाली थांबा, आणि प्रसंगी गुडघ्यावर रांगत तेथून बाहेर पडा.

  • कवर –

डोके आणि मान आपल्या हाताने झाका, जेणेकरून तुमचे ढिगाऱ्यापासून संरक्षण होऊ शकते. एक असा गैरसमज आहे की, भूकंपाच्या वेळी दरवाजे सर्वात सुरक्षित असतात, परंतु जर तुमचे घर खूप जुने असेल तर दरवाजाखाली थांबणे सुरक्षित नाही.

  • होल्ड –

हादरे थांबेपर्यंत तुम्ही टेबलाखाली किंवा इतर कोणत्याही सुरक्षित वस्तूखाली थांबा. शिवाय ती वस्तू एका हाताने पकडून ठेवा.

घराबाहेर असाल तर?

भूंकपाच्या वेळी तुम्ही घराबाहेर असाल तर झाडे, मोठ्या इमारती किंवा विद्युत तारांपासून दूर रहा. जास्तीत जास्त मोकळ्या मैदानावर थांबण्याचा प्रयत्न करा.

सोसायटी पार्कमध्ये थांबणे योग्य की अयोग्य?

भूकंपाच्या वेळी मोकळ्या जागेत थांबणे शक्य तितके सुरक्षित असते. परंतु सोसायटीच्या पार्कमध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. कारण गर्दी करणं धोकादायक ठरू शकते. इमारत खूप उंच असेल आणि मध्यभागी पार्क असेल तर तिथे उभं राहणे धोक्याचे आहे.

तुम्ही गाडी चालवत असाल तर –

तुम्ही वाहन चालवत असताना भूकंप आला तर लगेच गाडी एका ठिकाणी उभी कर आणि गाडीतच थांबा. गाडीतून उतरणे गरजेचं वाटल्यास गाडीपासून काही अंतरावर उभे रहा. विद्यूत तारा किंवा इमारतीजवळ उभे रहाणे शक्य तितके टाळा.

हेही वाचा- H1N1 आणि H3N2 चा संसर्ग कसा ओळखाल? नेमकी लक्षणं काय?

उंच इमारतीमध्ये राहत असाल तर काय कराल ?

भूकंप होतो तेव्हा इमारतींच्या बाहेर आणि दूर राहणे सर्वात सुरक्षित असते. भूकंपाच्या वेळी कोणतीही इमारत आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून जाणे धोकादायक ठरू शकते. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना भूकंप झाला तर पटकण बाहेर जाणं अवघड असते. अशा परिस्थितीत तुम्ही इमारतीच्या वरच्या मजल्यावर असाल तर तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. वर नमूद केलेल्या उपायांचे पालन करा आणि भूकंपाचे हादरे थांबल्यानंतरच इमारतीमधून बाहेर पडा.

लिफ्ट वापरू शकतो का?

भूकंपाच्या वेळी कधीही लिफ्टचा वापर करु नका. कारण भूकंप झाला की वीजपुरवठा बंद होतो. अशा स्थितीत तुम्ही लिफ्टमध्ये बराच वेळ अडकू शकता. याशिवाय भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर लिफ्ट कार खाली पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:15 IST

संबंधित बातम्या