आकाश निळे का दिसते?

उत्तर : पृथ्वीवर प्रकाश सूर्याकडून येतो. सूर्यप्रकाश पाहताना जरी पांढरा दिसला तरी त्याचे घटक तां, ना, पि, हि, नि, पां, जां हे आपणा सर्वाना माहिती आहे. सूर्यापासून निघालेला प्रकाश बराच अंतर निर्वात पोकळीतून प्रवास करतो. पृथ्वीच्या जवळ तो वातावरणात प्रवेश करतो. पृथ्वीच्या वातावरणात वायू (प्रामुख्याने नायट्रोजन व ऑक्सिजन) व धूलिकण आहेत. या वायूंचे अणू व कण यांचा आकार प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान आहे. या अणू व कणांमुळे प्रकाश विखुरतो. याला रॅलेचे विकिरण असे म्हणतात. विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश अधिक विखुरतो व आपल्याला आकाश निळे दिसते.

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

चंद्रावरून आकाश कसे दिसते?

उत्तर :   चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून त्यावर वातावरण नाही. सूर्यप्रकाश चंद्रावर निर्वात पोकळीतून प्रवास करून पोहोचतो. मार्गात वायूचे अणू किंवा इतर कोणतेही कण नसल्याने त्याचे विकिरण होत नाही असे असल्याने चंद्रावरून आकाशाकडे पाहिल्यास ते काळे दिसते.

सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाश तांबडय़ा रंगाचे का दिसते?

उत्तर :  सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजाजवळ असतो. क्षितिजाजवळ असताना सूर्यप्रकाश माध्यान्हापेक्षा वातावरणातून साधारणत: अडतीसपटपेक्षा जास्त अंतर कापतो. हे जास्त अंतर कापताना कमी तरंगलांबीचा निळा व इतर प्रकाश पूर्णपणे विखुरले जाऊन पृथ्वीवर अधिक तरंगलांबीचा प्रकाश नारंगी व तांबडा रंग अधिक पोहोचतो. त्यामुळे आकाश लालसर दिसते. त्याचप्रमाणे उगवता किंवा मावळता सूर्यदेखील लालसर दिसतो. थोडा वर आल्यावर सूर्याचा स्वत:चा पिवळा रंग दिसतो. माध्यान्हाच्या वेळी डोक्यावर असताना त्याच्या कडून येणाऱ्या प्रकाशातील सर्व तरंगलांबीचे प्रकाश समान प्रमाणात विखुरल्यामुळे सूर्य पांढरा दिसतो.

ढग पांढरे किंवा काळे का दिसतात?

उत्तर : ढगांमध्ये पाणी असते व जेव्हा या पाण्याचे प्रमाण कमी असते तेव्हा त्यातील पाण्याचे कण सर्व तरंगलांबीचे प्रकाश समान विखुरतात. सर्व सात रंग समसमान विखुरले गेल्यामुळे ढग पांढरे दिसतात. पाण्याचे प्रमाण वाढून ढग खूप मोठा झाला, की त्यातील प्रकाश विखुरण्यापेक्षा पाणी शोषून घेतो व असे ढग करडे किंवा काळे दिसतात.

– सुधा मोघे – सोमणी (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)