09 April 2020

News Flash

२९०. सर्वागाचे कान

ती अशी की, सद्गुरूची आपण भेट घेतो आणि त्यांना एका देहाच्या वा स्थानाच्या सीमेत मर्यादित करतो.

आत्मज्ञान हृदयात नीटपणे ठसावं म्हणून अवधूतानं आत्मविचारानं अनेकांना अहोरात्र गुरुत्व दिलं, आत्महिताकरता हे गुरू केले! या कृतीत साधकांसाठी एक फार मोलाची शिकवण दडली आहे बरं का! ती अशी की, सद्गुरूची आपण भेट घेतो आणि त्यांना एका देहाच्या वा स्थानाच्या सीमेत मर्यादित करतो. म्हणजे, ‘साईबाबांचं दर्शन घ्यायचं, तर शिर्डीलाच जायला हवं!’ तर बाबांना आपण शिर्डीपुरतं आणि शिर्डीमध्येच ठेवतो. त्यांना घरात आणि हृदयस्थानी दृढ बसवलेलं नाही! साईबाबांचा उल्लेख उदाहरणापुरता केला. हीच गोष्ट प्रत्येक सद्गुरू स्वरूपाच्या बाबतीत घडते. दुसरं एका आकारात फक्त त्यांना पाहण्याची सवय आहे. इथं अवधूतानं जगातल्या प्रत्येक आकार-प्रकारांत फक्त जे घेण्यासारखं होतं त्या सर्वच गोष्टींना गुरू मानलं आणि ग्रहण केलं. माझ्या आयुष्यात येत असलेल्या प्रत्येक प्रसंगातून तसंच सहवासात आणि संपर्कात येत असलेल्या प्रत्येक लहान-थोर, चांगल्या-वाईट व्यक्तींच्या माध्यमातून माझा सद्गुरूच मला शिकवत आहे, घडवत आहे वा सांभाळत आहे; असा भाव कायमचा झाला, तर मग आकारात प्रेमानं वा द्वेषानं गुंतणं होणार नाही. आकाराचा प्रभाव न पडता निराकार बोधाचाच ठसा उमटेल. मग अवधूत राजा यदूला जेव्हा या २४ गुरूंची माहिती सांगू लागला तेव्हा ‘सावध चित्त करीं राया,’ असा सल्ला त्यानं दिला. मग यदूनं चित्त किती सावध करावं? ‘एकनाथी भागवता’त श्रीएकनाथ महाराज सांगतात, ‘‘ऐकावया गुरुलक्षण। यदूनें सर्वाग केलें श्रवण। अर्थी बुडवूनियां मन। सावधान परिसतु॥३५८॥’’ (अध्याय सातवा). म्हणजे चराचरांत भरलेल्या गुरुतत्त्वाची लक्षणं ऐकण्यासाठी यदूने सर्वागाचे जणू कानच केले! आणि अर्थामध्ये मन घालून तो लक्ष देऊन ऐकू लागला. इथं श्रवण किती काटेकोर पाहिजे हे स्पष्ट करताना नाथ म्हणतात, ‘‘शब्द सांडोनियां मागें। शब्दार्थामाजीं रिगे। जें जें परिसतु तें तें होय अंगें। विकल्पत्यागें विनीतु॥३५९॥’’ जे जे शब्द ऐकले त्या त्या शब्दांची टरफलं टाकून त्यातील अर्थ तेवढा ग्रहण केला आणि विकल्प सोडून त्या अर्थरूपाशी तो तद्रूप होऊ लागला! श्रोत्यांनी कसं ऐकावं, वाचकानं कसं वाचावं, याचा हा परिपाठ आहे. हे शब्दांच्या बाह्य़रूपात न अडकता अर्थरूप अनुभवणं आहे! जेव्हा एकाग्रतेनं, सावध चित्त होऊन ऐकलं जाईल, वाचलं जाईल तेव्हाच हे घडेल. मग जे ऐकलं जात आहे, वाचलं जात आहे त्याद्वारे प्रकट होणारं जे तथ्य आहे ते आपल्या अनुभवसंचिताशी ताडलं जाईल. आपल्या जगण्याशी तपासलं जाईल. आंतरिक धांडोळा घेतला जाईल. त्यातून कधी वीज चमकावी तसा बोध अंतर्मनाच्या आकाशात लखकन चमकून जाईल. अंतर्मन बोधप्रकाशानं नेहमीच व्याप्त व्हावं, ही तळमळ लावून जाईल. आपल्या धारणेतील, आकलनातील चुका लक्षात आणून देईल. सुधारणेस वाव देईल. चिंतन, मननास चालना देईल. पण हे श्रवण एकाग्र आणि पूर्ण अवधानपूर्वक हवं. माझ्या नात्यातील एक डॉक्टर पती-पत्नी माऊंट अबूला काही काळ वास्तव्यास होते. ते काही वेळा विमलाताई ठकार यांच्याकडे जात असत. त्यांनी प्रथमच आपल्या तरुण मुलाला नेलं होतं. विमलाताई बोलत असताना त्यानं एकदाच आतल्या खोलीकडे क्षणभर पाहिलं मात्र, त्या कडाडल्या, ‘‘आत काय आहे? बोलण्याकडे लक्ष का नाही?’’ इतकं ऐकणं सावध पाहिजे! मन कोणत्या क्षणी फसवून कुठे लक्ष ओढून नेईल, याचा भरवसा नाही. तेव्हा अवघ्या देहाचा कान करून ऐकलं म्हणजेच देहाचं अवांतर भान लोपलं तर खरं एकरूपतेनं ऐकलं जाईल.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 12:03 am

Web Title: article ekatmyog akp 94 3
Next Stories
1 २८९. जीवन-बोध
2 २८८. गुण आणि दोष
3 २८६. आज आणि आत्ताच!
Just Now!
X