26 May 2020

News Flash

१९१. हरिचरणचंद्र-चकोर!

सगळं जग झोपलं असताना तो एकटा जागा राहून चंद्रकिरणांचं पान करीत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

 चैतन्य प्रेम

ज्यांची हरीचरणांवर अशी दृढ भक्ती जडली असते त्यांचं वर्णन आता नवनारायणांतील हरी नामक दुसरा योगी राजा जनकासमोर सुरू करीत आहे. कवि नारायण या आपल्या ज्येष्ठ बंधूनं हरीचरणांची प्रीती ब्रह्मदेव आणि शंकरांनीही साध्य केली, असं सांगितलं. आता या भक्तांच्या प्रेमस्मरणात चिंब झालेला हरी नारायण सांगतो की,  हे राजा ज्या जगात सामान्य माणूस वावरतो, त्रिविध तापांनी पोळला असतो त्याच संसारात हे भक्तदेखील राहतात, पण त्यांच्या अंत:करणात जगाचा ताप जणू शिरतच नाही! जीवनातल्या ज्या चढउतारांनी सामान्य माणूस खचून जातो, त्यापेक्षा अधिक उलथापालथ होऊनही भक्ताच्या अंत:करणातील शांती ढळत नाही. याचं रहस्य उलगडताना हरी सांगतो, ‘‘जे हरिचरणचंद्र-चकोर। स्वप्नींही संसारताप न ये त्यांसमोर। ऐसा चरणमहिमा अपार। हरि मुनीश्वर हर्षे वर्णी।।७६७।।’’ अरे राजा, हे भक्त म्हणजे हरिचरणरूपी चंद्राचे चकोरच असतात! चकोराची ही उपमा विलक्षणच आहे. हा चकोर पक्षी चंद्रावर दृढ प्रेम करीत असतो. रात्रभर तो चंद्राकडे एकटक पाहात असतो. त्या चंद्रकिरणांतून पाझरणारं अमृत प्राशन करीत तो तग धरून असतो, अशीही कविकल्पना आहे. तसे हे भक्त असतात आणि हा चंद्र म्हणजे हरीचरण! हा चकोर पक्षीसुद्धा याच जगात राहात असतो ना? तरीही त्याला भूक-तहान कशाची पर्वाच नसते जणू. सगळं जग झोपलं असताना तो एकटा जागा राहून चंद्रकिरणांचं पान करीत असतो. त्याचप्रमाणे हा हरीचा भक्तदेखील या जगातच असतो. या जगाला आसक्ती-मोहाची जी तहान-भूक लागली आहे तिचा या भक्ताच्या ठायी अभाव असतो. त्याचं लक्ष केवळ हरीचरणांकडे म्हणजे सद्गुरूंकडे असतं. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाकडे, ध्येयाकडेच असतं. त्यांच्या बोधाचं अमृतपान हाच त्याच्या जगण्याचा एकमेव आधार असतो. सगळं जग जेव्हा मायानिद्रेत गाढ झोपलं असतं, अर्थात मायाग्रस्त जगाला जाग आलेली नसते तेव्हाही हा भक्तरूपी चकोर आपल्या सद्गुरूबोधरूपी चंद्रकिरणांचं प्राशन करीत असतो! मग त्याच्या अंत:करणात जगाचा ताप शिरणार तरी कुठून? ज्याच्या मनात आसक्ती आहे, अहंभाव आहे, मोह आहे, लोभ आहे त्याच्याच मनात हवं-नकोपण असणार ना? जिथं हवं-नकोपण आहे म्हणजेच अमुक हवं आणि अमुक नको, अशा अपेक्षांची गर्दा आहे तिथंच अपेक्षाभंगाची शक्यता आणि त्यायोगे दु:ख-दाह सहज शक्य आहे ना? हा भक्त या सर्व गोष्टींपासून अलिप्त असतो. या ओवीआधीच्या ओवीत हरी सांगतो की, ‘‘त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती। सर्वथा बाधूं न शके पुढती। जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती। चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे।।७६६।।’’ काय सुरेख उपमा आहे पहा! चंद्राचा जो प्रकाश आहे तो सूर्याचाच परावर्तित प्रकाश आहे. पण सूर्याच्या प्रकाशाचा प्रखरपणा चंद्राच्या प्रकाशात नाही! जणू तो संपूर्ण प्रखरपणा शीतल चंद्रबिंब शोषून घेतं आणि जगाला सुखदशांत करणारा आल्हादकारक प्रकाश परावर्तित करतं. त्याप्रमाणे जगाचा अवघा ताप हरीचरणरूपी चंद्र शोषून घेतो आणि भक्ताचं जीवन केवळ शांतशीतल आल्हादकारक आणि तापरहित अशा प्रकाशानं भरून जातं. त्या शांत, स्थिर, निर्लिप्त आणि तरीही पूर्णतृप्त प्रकाशाचं प्रतिबिंब या भक्ताच्या चेहऱ्यावरदेखील विलसत असतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 1:26 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 191 zws 70
Next Stories
1 १९०. अनन्यशरण
2 १८९. त्रिभुवनाचं सुख
3 १८८. खरं ‘स्व’ अवलंबन!
Just Now!
X