आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसने तर या निवडणुकीसाठी सर्वस्व पणास लावल्याचं चित्रं आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि ज्येष्ठ नेते राहिलेले माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचा एक किस्सा आवर्जुन सांगितला. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

यशवंत सिन्हा म्हणाले, “ममता बॅनर्जी व आम्ही सोबत राहून अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये काम केलं होतं. ममता बॅनर्जी या सुरूवातीपासूनच एक योद्ध्या राहिलेल्या आहेत. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा इंडियन एअरलाइन्सचे अपहरण झाले होते व दहशतवाद्यांनी ते विमान कंधारला नेले होते. तेव्हा कॅबिनेटमध्ये एकदिवस चर्चा सुरू असताना, ममता बॅनर्जींनी असा प्रस्ताव मांडला होती की, त्या स्वतः ओलीस म्हणून तिथं जातील व अट ही असायला हवी की, विमानातील जे प्रवासी ओलीस म्हणून ठेवलेले आहेत त्यांची दहशतवाद्यांनी सुटका करावी आणि त्या स्वत: दहशतवाद्यांच्या ताब्यात जातील व देशासाठी जे बलिदान द्यावं लागेल ते देतील.”

यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या धैर्याची माहिती देणारा हा किस्सा भर पत्रकारपरिषदेत सांगितल्यानंतर सध्या राजकीयव वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

एकेकाळी भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपाकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.