Zeeshan Siddique joins Ajit Pawar group: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी हे अद्याप काँग्रेसमध्ये असतानाच त्यांच्या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासूनच झिशानही वडिलांच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. झिशान सिद्दिकी हे काँग्रेसवर वारंवार टीका करत होते. तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनाही त्यांनी विकासकामांवरून लक्ष्य केले होते. त्यामुळे काँग्रेसने विद्यमान आमदार असतानाही हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंना दिला. त्यामुळे आता झिशान सिद्दिकी यांना अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आता ते आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्वमधून टक्कर देणार आहेत.
दरम्यान शिवेसनेने वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देताच झिशान सिद्दिकी यांनी एक्सवर पोस्ट करून यावर टीका केली होती. १२ ऑक्टोबर रोजी झिशान सिद्दिकी यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, मात्र मविआने त्यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी एक्सवर संतप्त भावना व्यक्त केल्या.
“जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईल त्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!”, अशी भावना झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केली होती.
मविआने कठीण काळात खेळ खेळला
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात झिशान सिद्दिकी यांनी प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर आरोप केले. ते म्हणाले, माझ्या कठीण काळात महाविकास आघाडीने माझ्याबरोबर खेळ खेळला. याचे उत्तर वांद्रे पूर्वची जनता निवडणुकीच्या माध्यमातून देईल.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड
वांद्रे पूर्व हा मतदारसंघ उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला हा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला.
शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांची या मतदारसंघावर (Vandre East Assembly constituency) पकड होती. ते वांद्रे पूर्वेकडील एका वॉर्डमधून १९९७ ते २००९ पर्यंत नगरसेवक होते. २००९ मध्ये त्यांना शिवसेनेने येथून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सावंतांनी ही निवडणूक जिंकली. २०१४ साली पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकीटावर ते येथून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं. बाळा सावंतांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने बाळा सावंतांची पत्नी तृप्ती सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर, काँग्रेसने नारायण राणे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र सावंत यांनी नारायण राणेंचा तब्बल १९ हजार मतांनी पराभव केला.